नवी दिल्ली | संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरु होणार असून १ फेब्रुवारीला २०२०-२०२१ चा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन मोदी सरकारच्या काळातील दुसरा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. देशाचा अर्थसंकल्प सादर करण्याची त्यांची ही दुसरी वेळ आहे पण भारताचा अर्थसंकल्प सर्वाधिक सादर करण्याचा रेकॉर्ड कोणाच्या नावावर आहे हे जाणून घ्या या लेखातून.
भारताचा अर्थसंकल्प संसदेत सर्वाधिक वेळा मांडण्याचा विक्रम माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. स्वतंत्र भारताचे ४ थे पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी अर्थमंत्री म्हणून १० वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. मोरारजींनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्यांत अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे नाव येते, त्यांनी आतापर्यंत संसदेत ८ वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. मोरारजी देसाई यांनी पहिल्यांदा अर्थमंत्री पदाची धुरा १३ मार्च १९५८ साली हाती घेतली ती त्यांनी २९ ऑगस्ट १९६३ पर्यंत लीलया सांभाळली. त्यानंतर लगेचच मार्च १९६७ ते जुलै १९६९ या काळात त्यांनी पुन्हा अर्थमंत्रिपदाचा आणि उपपंप्रधान या दोन पदांचा कार्यभार स्वीकारला. या दरम्यान त्यांनी केंद्राचे १० अर्थसंकल्प संसदेत सादर केले, त्यातील ८ अर्थसंकल्प त्यांनी पुर्ण मांडले २ अंतरिम अर्थसंकल्प मांडले. १९६४ आणि १९६८ या काळात मोरारजी यांनी आपल्या वाढदिवशीही संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला होता.
माजी पंतप्रधान आणि अर्थमंत्री मोरारजी देसाई यांचा जन्म २९ फेब्रुवारी १८९६ साली गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील भादेल या गावी झाला. १९७७ साली स्थापन झालेल्या बिगर-कॉंग्रेसच्या सरकारमध्ये २४ मार्च १९७७-२८ जुलै १९७९ या काळात मोरारजी देशाचे पंतप्रधान झाले. आर्थिक नियोजन आणि वित्तीय प्रशासनाबाबतचे ज्ञान त्यांनी कृतीमध्ये उतरवले. संरक्षण आणि विकासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी महसूल वाढवला, अनाठायी खर्चात कपात केली आणि प्रशासनावरील सरकारी खर्चात काटकसरीला प्रोत्साहन दिले. आर्थिक शिस्तीची अंमलबजावणी करुन त्यांनी वित्तीय तूट कमी केली. समाजातील उच्चभ्रू वर्गांकडून होणाऱ्या वारेमाप खर्चावर नियंत्रणही आणले.
मोरारजी देसाईं नंतर सर्वाधिक वेळा म्हणजे ८ वेळा संसदेत अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री म्हणजे पी. चिदंबरम. एच.डी देवगौडा यांच्या नेतृत्वात संयुक्त मोर्चाच्या सरकारमध्ये चिदंबरम १ जून १९९६ साली पहिल्यांदा अर्थमंत्री झाले. २१ एप्रिल १९९७ पर्यंत त्यांनी या पदाची धुरा सांभाळली. यानंतर १ मे १९९७-१९ मार्च १९९८ पर्यंत तत्कालीन पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या सरकारमध्ये पुन्हा ते अर्थमंत्री होते. त्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात यूपीए-१ सरकारमध्ये चिदंबरम २००४ ते २००८ या काळात पुन्हा अर्थमंत्री म्हणून कार्यरत होते. चिदंबरम हे ३१ जुलै २०१२ ते २६ मे २०१४ या काळात चौथ्यांदा मनमोहन सिंग यांच्याच नेतृत्वात यूपीए-२ मधील अर्थमंत्री राहिले होते. असे एकूण चार वेळा अर्थमंत्रीपद सांभाळलेले पी.चिदंबरम यांचा क्रमांक मोरारजी देसाई यांच्यानंतर लागतो.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.