HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई उपनगर जिल्हा वार्षिक योजनेच्या ६५० कोटीच्या निधीस मंजुरी – अजित पवार

मुंबई। पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे वित्तीय मर्यादेमध्ये 270 कोटींची अतिरिक्त भर पडून सन 2022-23 साठी मुंबई उपनगर जिल्हा वार्षिक योजनेच्या 650 कोटींच्या निधीस राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली. मुंबई उपनगर जिल्ह्यात सुरू असलेली आणि प्रस्तावित कामे नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार असून इतरत्रही अशी कामे हाती घ्यावीत अशा शब्दात त्यांनी कौतुक केले. मुंबई उपनगर जिल्ह्याने सादर केलेले लोकसंख्येची घनता, मानव विकास निर्देशांक, दरडोई उत्पन्न, नागरीकरण, विधानसभा सदस्यांची संख्या आदी मुद्दे विचारात घेऊन राज्यातील अशा जिल्ह्यांना वाढीव निधी देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी नियोजन विभागास दिले.

मुंबई उपनगरच्या जिल्हा वार्षिक योजना 2022-23 च्या आराखड्याला मान्यता देण्यासाठी राज्यस्तरीय बैठक उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने झाली. या बैठकीस राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल, पर्यटन तथा राजशिष्टाचारमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, मत्स्यव्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख, वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई, मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्री सचिवालयाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई उपनगर जिल्ह्यातील आमदार सर्वश्री सुनिल राणे, प्रकाश सुर्वे, रमेश कोरगावकर, सुनिल प्रभू, दिलीप लांडे, झिशान सिद्दीकी, ॲड.आशिष शेलार, विलास पोतनीस, श्रीमती मनिषा चौधरी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी भूषण देशपांडे यांच्यासह जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची सार्वजनिक जीवनशैली उंचावण्याला प्राधान्य दिले जाणार असून सन 2022-23 च्या आराखड्यात शाश्वत विकास ध्येयांच्या पूर्तीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. यासाठी जिल्हा नियोजन आणि शाश्वत विकासाची सांगड घातली जाणार असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी फुटपाथ चांगले करणे, उड्डाणपुलाखालील जागेचे सौंदर्यीकरण, शाळेच्या परिसरात सुरक्षितता, दुहेरी पार्किंगच्या जागी वाहतूक व्यवस्थापन, पश्चिम द्रुतगती मार्गासह शहरातील इतर महत्त्वाचे मार्ग आणि जोडरस्त्यांच्या सौंदर्यीकरणाची कामे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्याची एकंदर भौगोलिक परिस्थिती आणि लोकसंख्या लक्षात घेता त्यांनी पवार यांना मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी भरीव तरतूद करण्याची विनंती केली.

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यावेळी जिल्हा वार्षिक योजना 2022-23 च्या प्रारूप आराखड्याचे सादरीकरण केले. शासनाने सन 2022-23 वर्षाकरिता 379.66 इतकी वित्तीय मर्यादा आखून दिली असून कार्यान्वयन यंत्रणांकडून 789.27 कोटी इतकी मागणी आहे. प्रस्तावित केलेल्या नियतव्ययानुसार रूपये 321.98 कोटींच्या वाढीव मागणीसह एकूण 701.64 कोटींचा प्रारूप आराखडा बैठकीसमोर ठेवण्यात आला. सन 2021-22 मध्ये सर्वसाधारण योजनेजेअंतर्गत प्राप्त तरतूद रुपये 440 कोटींच्या अधिन राहून रूपये 340.81 कोटींच्या प्रशासकीय मान्यता देऊन रूपये 289.54 कोटींचा निधी वितरित करण्यात आल्याचे सांगितले. वितरीत निधीपैकी रुपये 286.35 कोटींचा निधी खर्च झाला आहे. तर एकूण खर्चाची एकूण टक्केवारी 67 इतकी आहे. वर्षअखेर 100 टक्के निधी खर्च होणार असल्याचे त्या म्हणाल्या.

जिल्ह्यात यावर्षी नाविन्यपूर्ण आणि इतर योजनांअंतर्गत इस्माईल युसुफ महाविद्यालय, जोगेश्वरी येथे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करणे, महिलांना रोजगार निर्मिती अंतर्गत कापडी पिशव्या बनविण्याचा प्रकल्प, बंदरांचा विकास व प्रवासी सुखसोयी, नागरी दलितेतर वस्त्या (सौंदर्यीकरण) योजनेअंतर्गत सुशोभीकरण आदी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर, स्मार्ट अंगणवाडी, अक्सा बीच येथील सागर किनाऱ्याच्या पर्यटनदृष्ट्या विकासाचे संकल्पन चित्र, मुलांसाठी खेळण्याची जागा, ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्याने, ओपन जिम, योगा स्पेस, बांबू शेड्स, गजिबो आणि हिरवळीचे क्षेत्र, गोराई कांदळवन उद्यान आदी वैशिष्ट्यपूर्ण कामे मंजूर करण्यात आली आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील गांधी टेकडी परिसराचा विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

जिल्ह्यात वैशिष्ट्यपूर्ण नागरीकरणाची रणनीतीअंतर्गत अंधेरी-घाटकोपर लिंक रोडचे पर्यावरणपूरक सौंदर्यीकरण, बेस्ट बस थांब्यांचे नूतनीकरण, स्मार्ट सिग्नलिंग आणि वाहतूक व्यवस्थापन, पार्क आणि उद्यानांचा विकास, वांद्रे बँडस्टँड येथे ट्री हाऊस, फ्लायओव्हर खालील मोकळ्या जागांचा वैशिष्ट्यपूर्ण वापर, भांडूप तलावाचे पुनरूज्जीवन, वांद्रे रिक्लेमेशन सेंटर येथे विद्युत रोषणाई, छोटा काश्मीर उद्यानाचा विकास आदी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात भूस्खलनाचे संभाव्य धोके टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या जात आहेत. तर, सन 2022-23 च्या आराखड्यात अपारंपरिक ऊर्जा विकास योजनेचा नव्याने समावेश करण्यात आला असून अपारंपरिक ऊर्जा साधनांचा शासकीय स्तरावर वापर वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 446 चौ.कि.मी.(राज्याच्या 0.13 टक्के) असून लोकसंख्या 93.57 लक्ष (राज्याच्या 8.33 टक्के) आहे. जिल्हा हा संपूर्ण नागरीकरण झालेला व सर्वात जास्त लोकसंख्येची घनता (20980 प्रती चौ.कि.मी. लोकसंख्या) असलेल्या जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. लोकसंख्या व रोजगार क्षमता, वांद्रे-कुर्ला संकुल, सीप्झ, बी.पी.ओ. यासारखी व्यापारी केंद्रे, आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनी, एस्सेल वर्ल्ड, माऊंट मेरी चर्च, गिल्बर्ट हिल, कान्हेरी गुंफा, जोगेश्वरी गुंफा, महाकाली गुंफा, पवई तलाव यासारखी पर्यटन स्थळे; जुहू, गोराई, मढ, बँड स्टँड, अक्सा, वर्सोवा, मार्वे यासारखी प्रसिद्ध समुद्र किनारे आणि चौपाट्या, चित्रपट सृष्टीचे माहेरघर ‘बॉलिवूड’ ही उपनगर जिल्ह्याची बलस्थाने आहेत. तर जिल्हा नियोजनासाठी तुटपुंजे संसाधन, गुंतागुंतीच्या महानगरीय संरचना व त्यासाठीच्या उपाययोजनांसाठी जिल्हास्तरीय योजनांचा अभाव ही जिल्हा नियोजनासमोरील आव्हाने असल्याचे सादरीकरणाद्वारे सांगण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीस बोलतात त्या सगळ्याच गोष्टी गांभीर्याने घेण्याची गरज नाही – संजय राऊत  

News Desk

मराठा आरक्षणासंबंधी दिल्लीच्या वकिलांशी अशोक चव्हाणांनी केली चर्चा

News Desk

दुतोंड्या विषारी सापाची अवलाद आहात काय? सामनातून अजित पवारांवर टीका

News Desk