HW News Marathi
क्राइम

अंबरनाथमध्ये सिमेंटचा बेंच पडून चिमुकलीचा मृत्यू ,

गौतम वाघ

अनेक महिन्यांपासून निखळलेल्या बेंचकडे सोसायटीचे दुर्लक्ष,

अंबरनाथ : सोसायटीत बसवलेला सिमेंटचा बेंच अंगावर पडून पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. नम्रता धनवे असे या चिमुकलीचे नाव असून ती अंबरनाथ पूर्व भागातील शिवालिक नगर सोसायटीत राहण्यास होती. गुरुवारी सायंकाळी खेळायला गेलेली असताना निखळलेला सिमेंटचा बेंच तिच्या अंगावर कोसळला आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तिच्या अंगावर कोसळलेला बेंच मागील अनेक महिन्यांपासून निखळलेला असून सोसायटीला याची पूर्ण कल्पना होती. मात्र तरीही तो दुरुस्त न केल्यानेच ही दुर्दैवी घटना घडल्याचे सोसायटीतील रहिवाशांचे मत आहे. मात्र ही बाब अंगाशी येण्याची चिन्हे दिसताच या भागातील शिवसेना नगरसेविकेच्या पतीने सोसायटीला वाचवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. > शिवालिक नगरमधील तानसा इमारतीत राहात असलेल्या नम्रताला एक वर्षाचा लहान भाऊ असून तिचे वडिल सैन्यात आहेत. सध्या ते शिमला येथे कर्तव्य बजावत आहेत. मुलीच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर ते तातडीने मुंबईकडे रवाना झाले. गुरुवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे शिवालिक नगरमध्ये खेळण्यासाठी नम्रता खाली आली. यावेळी तेथील वैनगंगा इमारतीसमोरील एका तुटक्या बेंचवर ती बसली होती, मात्र हा बेंच निखळलेला असल्याने तिच्या वजनाने तो तिच्या अंगावर उलटला. यावेळी काही महिलांनी तिला उचलून जवळील बीजांकुर रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंतच तिचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तिचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. दरम्यान, नम्रताचा रुग्णालयात नेताच मृत्यू झाल्याबाबत तिच्या आईला कल्पना देण्यात आली नव्हती. शिमला येथून तिचे वडिल आल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी तिच्या आईला याबाबत सांगण्यात आले. या घटनेने धनवे कुटुंबासह संपूर्ण शिवालिक नगरवर शोककळा पसरली आहे. सोसायटीची कातडी वाचवण्यासाठी धावाधाव नम्रताचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार सोसायटीच्या निष्काळजीपणामुळे झाल्याची चर्चा सुरू झाली. मात्र हा प्रकार सोसायटीच्या अंगाशी येण्याचे दिसू लागताच सोसायटीतील शिवसेनेच्या काही पदाधिका-यांनी नम्रताचे शवविच्छेदन करू न देण्याचा निर्णय घेतला. काही पत्रकार शिवालिक नगरमध्ये वार्ताकनासाठी गेले असता त्यांनाही शिवसेनेशी संबंधित काही महिलांनी वार्तांकन करण्यापासून रोखले. मात्र यानंतर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी शवविच्छेदन करावेच लागेल अशी भूमिका घेतली. यादरम्यान, मृत नम्रताच्या काकाची जबानी पोलिसांनी घेतली, मात्र त्याचेही सांत्त्वन करण्याऐवजी सोसायटीची चूक कशी नाही, हेच पटवून देण्यात सोसायटीचे काही सदस्य आघाडीवर होते. तर पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी शिवसेनेच्या या भागातील नगरसेविकेचा पतीही रुग्णालयात ठाण मांडून बसला होता. गुन्हा दाखल करणारच! या प्रकाराबाबत पोलिसांनी सध्या अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. त्यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गोडबोले यांना विचारले असता, अशा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल होतच असतो, असे त्यांनी स्पष्ट केले. आता मृत मुलीच्या आई-वडिलांचे जबाब घेण्यात येतील, त्यानंतर हा बेंच कुणी बसवला, तो किती दिवसांपासून निखळला होता, याची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळलेल्यांवर गुन्हा दाखल केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तरुणीच्या अपहरणावरून नवनीत राणांचे पोलिसांसोबत खडाजंगी

Aprna

नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसमधील थरार

News Desk

१९ सप्टेंबरपर्यंत संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Aprna