Site icon HW News Marathi

नागपुरात दारूड्या पोलिसाला लोकांनी चोपले

नागपूर येथील भूषण झरकर या पोलीस कर्मचाऱ्याचे मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातल्यामुळे संतप्त नागरिकांनी रविवारी सायंकाळी त्याला चोप चोप चोपले. तसेच त्याच्या या वर्तनामुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यावर सोमवारी निलंबनाची कारवाई केली.

सात वर्षांपूर्वी पोलीस खात्यात दाखल झालेल्या भूषणला सुरुवातीलाच बजाजनगर पोलीस ठाण्यात नियुक्ती मिळाली. नवीन असल्यामुळे आणि चांगले काम करीत असल्यामुळे त्याला रस्त्यावरील गुन्हेगारी, अवैध धंदेवाल्यांना आवरण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. ती तो पार पाडत होता. मात्र, दारूच्या व्यसनाने त्याचा घात केला.

रविवारी त्याची ड्युटी शंकरनगर बीटमध्ये चार्ली म्हणून होती. भूषणने दुपारी ३ वाजेपर्यंत ड्युटी केल्यानंतर मित्रांसोबत सायंकाळपर्यंत मद्यप्राशन केले. सायंकाळी घरी परत जात असताना व्हीएनआयटी गेटजवळ एका हातठेल्यावर शेंगा अन् भुट्टा विकणाऱ्याजवळ तो गेला. गरम भुट्टा तातडीने पाहिजे असे म्हणत भूषणने दमदाटी केली. हातठेलेवाल्याने नकार दिल्याने त्यांच्यात वाद वाढला. यानंतर भूषणने तो हातठेला उलथवला. त्यामुळे शेगडीतील निखारे आजूबाजूच्यांच्या अंगावर उडाले. परिणामी हातठेलाचालक आणि बाजूची मंडळीही संतप्त झाली. त्यांनी भूषणची बेदम धुलाई केली. त्यानंतर बजाजनगर पोलिसांना कळविण्यात आले. घटनास्थळावर पोहचलेल्या पोलिसांनी भूषणला ताब्यात घेतले. ठाणेदार सुधीर नंदनवार यांना ते कळताच त्यांनी त्याची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे भूषणने ठाण्यातून पळ काढला.

हा सर्व घटनाक्रम पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांना कळताच त्यांनी गंभीर दखल घेतली. ठाणेदार नंदनवार यांना चौकशी करून तातडीने अहवाल देण्यास सांगितले. नंदनवार यांनी सोमवारी दुपारी अहवाल दिल्यानंतर उपायुक्त पाटील यांनी भूषणला निलंबित करण्याचा आदेश जारी केला. या प्रकारामुळे पोलीस खात्यात खळबळ निर्माण झाली आहे.

Exit mobile version