Site icon HW News Marathi

नांदेडमध्ये भारत-बांग्लादेश सामन्यावर सट्टा लावणा-यांना अटक- दोन लाख 83 हजारांचा मुद्देमाल जप्त

उत्तम बाबले

भारत – बांग्लादेश क्रिकेट सामन्यावर पैसे लाऊन सट्टा जुगार खेळविणा-या अड्ड्यावर नांदेडच्या विशेष पोलीस पथकाने १५ जून रोजी छापा मारला असून या कारवाईत सट्टा जुगार खेळविणा-या चार जणांसह २ लाख ८३ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी स्थापलेल्या विशेष पोलीस पथकाला गुप्त माहिती मिळाली की,सोमेश काॅलनी नांदेड येथील समिर मन्नूभाई पटेल यांच्या घरात भारत – बांग्लादेश क्रिकेट सामन्यावर पैसे लाऊन सट्टा जुगार खेळविला जात आहे.ही माहिती विशेष पोलीस पथक प्रमुख सहाय्यक पो.नि.ओमकांत चिंचोलकर यांनी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांना दिली व त्यांच्या आदेशानूसार पथकातील सहकारी पोलीस कर्मचारी लाठकर, जगताप, खंदारे, पायनापल्ले, निरणे, आवातिरक ,गंगुलवार आणि चालक देवकत्ते यांना घेऊन सरकारी जीप क्र.एम.एच.२६ आर.०६५३ ने सोमेश काॅलनी नांदेड येथे जाऊन १५ जून २०१७ रोजी रात्री ७:१५ वाजता समीर मन्नूभाई पटेल यांच्या घरी दोन पंचासमक्ष छापा मारला असता तेथे एका भिंतीवर एल.इ.डी.टि.व्ही.लावलेला होता आणि त्यावर भारत – बांगल्गादेश क्रिकेटचा सामना सुरु होता.तसेच समिर मन्नूभाई पटेल (४०), सुखवंतसिंग इंद्रजितसिंग सरदार (४८) रा.गेट नं.२,बडपुरा नांदेड,अमित सत्यनारायणसिंग लखोटीया ( ३९) रा.दिलीपसिंग काॅलनी नांदेड,बालचंद माणिकचंद बंगरुळे ( ४५) रा.वजिराबाद हेड काॅर्टर समोर,नांदेड हे चार जण मोबाईल फोन वरुन टाॅस,कॅच,विकेट,रन,बाॅलींग, फोर,सिक्स,स्कोर व खेळाडूवर पैसे लाऊन सट्टा जुगार खेळतांना आणि खेळवितांना आढळून आले.त्यांची चाैकशी केली असता त्यांनी सांगीतले की आम्ही आमच्या एजंट मार्फत छापा टाकण्या अगोदरच्या वेळेपुर्वी पर्यंत १ लाख ५० हजार रुपयाचे आकडे घेतलो आहोत.आमचे एजंट विविध ठिकाणाहून आकडे घेतात व आमच्याकडे पाठवितात.त्यानंतर हार जित प्रमाणे ज्यांचे त्यांना आम्ही ते पैसे एजंट मार्फत पुरवितोत.आम्ही मोठे आकडे पवन सोमाणी रा.नांदेड यांच्याकडे देतोत.तसेच इरफान कादरी रा.भोकर ह.मु.नांदेड हा भोकर च्या एजंट कडून आकडे घेतो व हार जित प्रमाणे नंतर तो पैसे वाटप करतो.या कारवाईत पथकाने उपरोक्त चार जणांना ताब्यात घेतले व तेथील टि.व्ही.,मोबाईल हँडसेट,सेटटाॅप बाक्स,काही रोख रक्कम व सट्टा जुगार खेळण्याचे आणि खेळविण्याचे साहित्य असे एकूण २ लाख ८३ हजार १० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.तर त्या अन्य दोघांचा शोध घेणे सुरु आहे. सहाय्यक पो.नि.ओमकांत चिंचोलकर यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार वजिराबाद,नांदेड पोलीसांत मुंबई जुगार कायदा कलम ४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वजिराबाद ठाणे पोलीस करत आहेत.

Exit mobile version