Site icon HW News Marathi

मंत्री पदाच्या लेटर हेडवर अशोक चव्हाणांच्या नावाने बनावट पत्रे

मुंबई |  मंत्री पदाच्या लेटर हेडचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तींनी बदनामीकारक बनावट पत्रे तयार केले असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पोलिसांत केली आहे. एवढेच नव्हे तर आपल्यावर पाळत ठेवली जात असून, घातपात घडविण्याचाही प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप देखील अशोक चव्हाणांनी केला आहे.

 

अशोक चव्हाणांनी दिलेल्या माहितीनुसार, “ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळातील काही शासकीय पत्रे मिळवून अज्ञात व्यक्तींनी त्यातील सही कायम ठेवून व मूळ मजकूर मिटवून बनावट कोरे लेटरहेड तयार केले आहे. विशेष म्हणजे या बाबीची कुणकुण त्यांना अगोदरच लागली होती. फक्त स्वाक्षरी असलेले एक कोरे लेटर हेड त्यांना मिळाले होते. त्यामुळे त्यांनी यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानुसार त्या प्रकरणाची ३१ जानेवारीपासून पोलीस चौकशीही सुरू झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी कायदेशीर दृष्ट्या योग्य दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी आपल्या पत्रात नमूद केली आहे.”

गैरसमज निर्माण करण्याच्या हेतून बनावट लेटर हेडचा वापर होऊ शकतो

“आज अशाच बनावट कोऱ्या लेटर हेडवर मराठा आरक्षणासंदर्भात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले एक खोटे पत्र मिळाल्याने चव्हाण यांनी तातडीने दखल घेत नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची भेट घेऊन याबाबत लेखी तक्रार दाखल केली. माझ्या सहीचे बनावट पत्र तयार करण्यात आले. त्यापुढील काळात अशा प्रकारे खोटे दस्तऐवज तयार करून त्यांचा गैरवापर होण्याची दाट शक्यता आहे. आगामी काळात राज्यात अनेक निवडणूका आहेत. या दृष्टीने जनतेत गैरसमज निर्माण करण्याच्या हेतून बनावट लेटर हेडचा वापर होऊ शकतो”, अशी शंका अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

 

 

Exit mobile version