Site icon HW News Marathi

श्रद्धा वालकरच्या पत्राची महाराष्ट्र पोलिसांनी दखल का घेतली नाही? आशिष शेलारांचा सवाल

मुंबई | श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दररोज एक नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. नुकतेच श्रद्धाने आफताब माझी हत्या करून त्यांचे तुकडे करून फेकणार आहे, अशी तक्रार नालासोपारा येथील तुळीज पोलिसांना ठाण्यात केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. आता हे पत्र दिल्ली पोलिसांच्या हाती लागले आहे. यानंतर राज्यातील भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी तत्कालीन महाविकास सरकारवर आणि पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर टीका केली आहे.

आशिष शेलार म्हणाले, “नराधम आफताबने श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे केले आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आमच्या महाराष्ट्रातील एक भगिनीचा खून आफताबने अतिशय क्रूर पद्धतीने केला. त्या सर्वांची चौकशी सुरु असताना आता माध्यमांसमोर एक पत्र आले आहे. त्या पत्रानुसार २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रद्धा वालकरने तिच्या जीवाला धोका असून तिचा खून करण्याचा प्रयत्न नराधम आफताब करणार आहे, अशी माहिती तिने महाराष्ट्र पोलिसांना दिली होती. या पत्राची रिसिव्हड कॉपी देखील माध्यमांवर आली आहे.”

“महाराष्ट्राचे तत्कालीन सरकार आणि पोलीस या विषयावर थंड का बसले? जर आमच्या मराठी भगिनीने तिच्यावर होणाऱ्या हल्ल्याची संपुर्ण माहिती दिल्यावर सुद्धा महाराष्ट्रातील पोलिस या पत्रावर का कारवाई करत नव्हती. श्रद्धाचे आडनाव वालकर होते म्हणून की तो आफताब होता म्हणून? सरकारमध्ये बसणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना समर्थन राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे होते म्हणून? की या सर्व प्रकारावर पांघरून घालायचे होते? या सगळ्याची चौकशी होणे ही काळाची गरज आहे. तत्कालीन पोलिस आणि सरकारने कडक कारवाई केली असती तर श्रद्धा आज वाचली असती. माझी पोलिसांना विनंती आहे की, हे पत्र दाबण्यात आले का, याची चौकशी दडपण्यात आली का? आफताबवर कारवाई होऊ नये याबाबत कुणाचे दडपण होते का? या सर्वांची चौकशी होणे गरजेचे आहे,” आशिष शेलार म्हणाले,

 

Exit mobile version