Site icon HW News Marathi

मध्य प्रदेशमधील मोटार सायकल चोरट्यांना धुळे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई | मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) चोरीला गेलेल्या मोटार सायकल चोरट्यांना धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (Dhule Local Crime Investigation Department) बेड्या ठोकल्या आहेत. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोटार सायकल चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. या चोरांनी चोरी केलेल्या मोटार सायकलची किंमत तब्बल 2 लाख 40 हजार रुपये किंमतीच्या एकूण 5 मोटार सायकली धुळे पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

चोरी झालेल्या मोटार सायकल प्रकरणी मध्य प्रदेश राज्यातील जुलवानिया (ता.बडवाणी) येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मध्य प्रदेशमधून धुळ्याकडे येणाऱ्या दोन संशयास्पद व्यक्तींना धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अडवत त्यांची चौकशी केली असता, त्यांच्या ताब्यातील मोटार सायकलीसंदर्भात कुठलीही कागदपत्रे त्यांच्याकडे आढळली नाही. चौकशीत त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यांना धुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळील मोटार सायकली पोलिसांनी जप्त केल्या.

 

या सर्व मोटार सायकलींची किंमत 2 लाख 40 हजार रुपये ऐवढी आहे. जिब्राईल हुसैन अहीर (20, संजय नगर, हुसैनी चौक, जकीरा मशिद जवळ, खरगोन जि. वडवाणी), तालिब मेहबुब पटेल (23 रा. संजय नगर, राजेंद्र नगर पाण्याच्या टाकी जवळ, खरगोन जि. बडवाणी,मध्यप्रदेश) ही संशयितांची नावे आहेत. मोटर सायकल जुलवानिया येथून चोरी करून धुळे येथे त्यांच्या नातेवाईकांकडे ठेवण्यासाठी घेवून जात असल्याची माहिती ताब्यात घेतलेल्या संशयितांनी धुळे पोलिसांना दिली.

 

दरम्यान, यापूर्वी संशयित आरोपी मध्य प्रदेश व महाराष्ट्रतील जळगाव जिल्ह्यातून तीन मोटार सायकली चोरी केल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली. परंतु, त्या दुचाकी नादुरुस्त असून, धुळे येथील संशयितांच्या नातेवाईकांकडे ठेवल्या असल्याचे सांगितले. या तीनही मोटारसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून अजून किती मोटारसायकल त्यांनी लांबविल्या आहेत. त्याचा तपास धुळे पोलिस करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.

Exit mobile version