Site icon HW News Marathi

विद्यापीठ आणि महाविद्यालयीन अध्यापकांची मेगा भरती

मुंबई | महाराष्ट्र शासन लवकरच ‍शिक्षक व शिक्षकेतर भरती करणार असून आता महाविद्यालयांना या जागा भरण्याची अनुमती दिली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये पदे रिक्त असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू होत्या. याविरोधात शिक्षकांनी अनेकवेळा आंदोलनेही केली गेली होती. शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. त्यामुळे तासिका तत्वावर अध्यापक भरती न होता आता थेट अध्यापक भरती करण्यात येईल. ध्यापकांच्या ३,५८० जागा, शारिरीक शिक्षण संचालनालयातील १३९ जागा, ग्रंथपालांच्या १६३ जागा आणि प्रयोगशाळा सहाय्यकांच्या ८५६ जागा अशी एकूण ४,७३८ पदे येत्या काळात भरण्यात येतील असेही तावडे यांनी सांगितले.

तासिका तत्वावरील बहुतांश अध्यापकांचे मानधन दुप्पट करण्यात आले असून त्यामध्येही वाढ करण्यात आली आहे. महाविद्यालय व विद्यापीठातील ही पदभरती उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रचलित धोरणानुसार केली जाईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षकांच्या आंदोलनाला यश आल्‍याचे मत शिक्षकांनी व्यक्‍त केले आहे.

Exit mobile version