Site icon HW News Marathi

HW EXCLUSIVE : पोलीस भरतीत शक्तीवर्धक इंजेक्शनचा बोलबाला; मुंबईतील चाचणी डोपिंगच्या विळख्यात?

मुंबई – राज्यभरात सध्या 18,821 पदांसाठी पोलीस भरतीची (Police Bharti ) प्रक्रिया सुरु आहे. विशेष म्हणजे सुमारे 15 लाख उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत. सरकारने पोलीस भरती जाहीर केल्यानंतर लाखो तरुण – तरुणी मैदानी चाचणीसाठी सराव करत आहेत. मात्र अनेक ठिकाणी उमेदवारांनकडून उत्तेजक औषधांचा (Power Boosting Medicine) वापर केला जात आहे. नांदेड (Nanded) आणि रायगड (Raigad) पाटोपाट आता मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात भरतीसाठी येणारे उमेदवार डोपिंगच्या (Doping) विळख्यात अडकले आहेत का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. दहिसरच्या (Dahisar)  वर्मा पोलीस भर्ती पूर्व अकॅडमीचे (Varma Police Bharti Purva Academy) 50 हून अधिक उमेदवार उत्तेजक गोळ्यांसह आणि इंजेक्शन (Injection) घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अकॅडमीचे प्रशिक्षक चंद्रप्रकाश वर्मा स्वतः उमेदवारांना ही औषध देत असल्याची माहिती HW मराठीने उघडकीस केली आहे.

वर्मा पोलीस भर्ती पूर्व अकॅडमीमध्ये 100 हून अधिक मुलं सध्या प्रशिक्षण घेत आहेत. ज्यात 50 हून अधिक मुलं कामगिरी उंचावण्यासाठी उत्तेजक औषध घेत असल्याची माहिती समोर आली आहे. अकॅडमीच्या वॉट्सअप ग्रुपचे (Whatsapp) चॅट HW मराठीच्या हाती लागले आणि यातून हि धक्कादायक बाब समोर आली. Aquaviron Injection 1ml, Sustanon 250 Injection अशी उत्तेजक औषधांचे फोटो सुद्धा या ग्रुपमध्ये उमेदवारांनी पाठवल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे मुंबईतील अनेक पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र उमेदवारांना अश्या पद्धतीची औषध देत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. गेल्या 4 वर्षात पहिली मोठी भरती असल्याने सर्व अकॅडमीमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. वर्चस्व राखण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उमेदवारांच्या जीवाशी खेळत असल्याचे सांगितले जात आहे.

 

 

काय आहे Aquaviron Injection 1ml आणि Sustanon 250?

Testosterone Enanthate (Aquaviron) आणि Sustanon 250 Injection हे तेल-आधारित (Anabolic–Androgenic Steroid) इंजेक्शन आहे. सामान्य भाषेत याला “स्टेरॉयड” म्हटले जाते. क्रीडा स्पर्धा “पारदर्शक” ठेवण्यासाठी आणि खेळाडूंचं हानिकारक औषधांपासून संरक्षण करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (The International Olympic Committee – IOC) आणि युनायटेड स्टेट्स ऑलिम्पिक समितीने (United States Olympic & Paralympic Committee) ऐनबालिक स्टेरॉयडचा (Anabolic Steroid) वापर बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे. तर स्टेरॉयडचा (Steroid) वापर भारतामध्ये सुद्धा बेकायदेशीर आहे. परंतु काही स्टेरॉयड डॉक्टरांच्या सल्यानंतर वापरले जाऊ शकतात.

 

 

ठाणे पोलिसांचं डोपिंगविरोधात ‘विशेष अ‍ॅन्टी डोपिंग पथक’

ठाण्यात (Thane) नुकतीच पोलीस भरती पार पडली. भर्ती दरम्यान शारीरिक चाचणी (Physical Exam) करणाऱ्या काही उमेदवारांनी आपली कामगिरी उंचावण्यासाठी इंजेक्शन घेतल्याचे आढळून आल्याची माहिती ठाणे पोलिसांना (Thane Police) मिळाली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी ऑक्सिबूस्टर (Oxybooster) हे शक्तीवर्धक औषध घेऊ नका अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला. ठाणे पोलिसांनीही असा प्रकार ठाण्यात घडू नये यासाठी विशेष अ‍ॅन्टी डोपिंग पथक (Special Anti-Doping Squad) तयार केले आहे.

“भरतीदरम्यान अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असून भरती प्रक्रियेतूनही त्या उमेदवाराला बाहेर काढले जाणार आहे”, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय जाधव यांनी दिली.

Exit mobile version