HW News Marathi
महाराष्ट्र

पाणी टंचाई उपाय व स्वच्छता विषयक घटकासाठी समन्वयाने सांघिकरित्या प्रयत्न करा – सदाभाऊ खोत   

नांदेड येथे पाणी टंचाई व स्वच्छता विषयक आढावा बैठक संपन्न

उत्तम बाबळे

नांदेड, दि. ९ :- जिल्ह्यातील टंचाईवरील उपाय योजना तसेच स्वच्छता अभियानासाठी सांघिकरित्या समन्वयाने प्रयत्न करा. त्यासाठी गाव-तालुकापातळीपर्यंत पोहचा , असे निर्देश कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज नांदेड येथे दिले. जिल्ह्यातील पाणी टंचाई व स्वच्छता विभागातील योजनांची आढावा बैठक राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डाॅ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे संपन्न झाली. बैठकीस माजी मंत्री आ.डी. पी. सावंत, आ.वसंतराव चव्हाण,आ. नागेश पाटील-आष्टीकर, महापौर शैलजा स्वामी, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, कृषी, जलसंपदा, तसेच विविध विभागांचे प्रमुख, जिल्हा परिषद पाणी पुरवठा, ग्रामपंचायत आदी विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

बैठकीत विविध बाबींचा आढावा घेतल्यानंतर बोलताना राज्यमंत्री ना. खोत म्हणाले की, गतवर्षी चांगला पाऊस होऊनही यावर्षी तीव्र उन्हाळ्यामुळे टंचाई लवकरच जाणवू लागली आहे. त्यामुळे प्रशासनावर मोठी जबाबदारी आली आहे. यासाठी या तीन महिन्यात सतर्क राहून , सांघिक प्रयत्न करायला हवेत. टंचाई आराखडा तयार केला गेला असेल , पण तो प्रत्यक्ष राबविण्यापुर्वी विविध घटकांशी संवाद-समन्वय राखणे इष्ट ठरते. त्यासाठी तालुकास्तरावर संबंधित लोकप्रतिनिधी ते सरपंच आणि तलाठी, ग्रामसेवक यांच्या बैठका घेण्यात याव्यात. समन्वय आणि संवादातून पुढे उद्भवणाऱ्या अडचणी यातून टाळता येऊ शकतात. जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या उपाययोजनांबाबत गांभीर्याने चर्चा करण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत अर्धवट राहिलेल्या पाणी पुरवठा योजनांचाही आढावा घेण्यात यावा. त्यातील निधी, त्याच्या विनीयोगातील अनियमीतता याबाबत जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देशही राज्यमंत्री ना. खोत यांनी यावेळी दिले. प्रसंगी यातील दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

टंचाई काळात पाणी पुरवठा करता यावा यासाठी गावा-गावातील पाणी योजनांच्या थकीत विज बिलांबाबतही राज्यस्तरावरून निश्चित असे धोरण ठरविण्यासाठी प्रयत्न करू, असे ना.खोत म्हणाले.

ग्रामस्वच्छता अभियानाच्या यशस्वितेसाठी नांदेड जिल्ह्याने समन्वयाने प्रयत्न करावेत, त्यासाठी लोकप्रतिनिधी पासून विविध घटक, सामाजिक संस्थांचा सहभाग घ्यावा, असे निर्देशही राज्यमंत्री ना. खोत यांनी दिले ते म्हणाले की, नांदेड जिल्ह्याची ओळख पॅटर्न निर्माण करणारा जिल्हा अशी आहे. त्यामुळे स्वच्छता या घटकात मागे राहू नये यासाठी संघटीतपणे प्रयत्न करण्यात यावेत. नवनिर्वाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसह सर्वच घटकांना या चळवळीत सहभागी करून घेण्यात यावे. यावेळी त्यांनी सार्वजनिक शौचालय उभारणीसाठी निधीची उपलब्धता व तरतूद याबाबतही निर्देशही दिले.

यावेळी झालेल्या चर्चेत आमदार सर्वश्री चव्हाण, सावंत तसेच नागेश पाटील-आष्टीकर यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. त्यामध्ये पाणी पुरवठा, सिंचनासाठीचे पाणी, स्वच्छता विषयक, कृषि, विज आदी बाबींचा समावेश होता. त्याबाबत बैठकीत चर्चाही झाली. प्रभारी जिल्हाधिकारी पाटील यांनी सुरवातीला टंचाई आराखड्याबाबतची व जिल्ह्यातील पाणीसाठ्याबाबतची स्थितीचे सादरीकरण केले. मुख्य कार्यकारी अधिकारी शिनगारे यांनी स्वच्छता विषयक व ग्रामीण पाणी पुरवठ्याविषयी माहिती दिली. शेवटी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डाॅ. मोटे यांनी आभार मानले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साईदर्शनधील 17 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांची घटनास्थळाला भेट

News Desk

नितीन राऊत यांचे उर्जामंत्रीपद जाणार? कॉंग्रेसमध्ये मोठा फेरबदल होण्याच्या चर्चा

News Desk

३७६ एसटी कर्मचार्‍यांचे निलंबन राज्य सरकारची कारवाई

News Desk