HW News Marathi
महाराष्ट्र

‘उडान’द्वारे पर्यटन, औद्योगिक, शिक्षण क्षेत्रातील अमर्याद संधी खुल्या – नरेंद्र मोदी

– नांदेड-हैद्राबाद विमानसेवेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओलिंकींगद्वारे

– श्रेयवादावरुन भाजपा – काँग्रेस कार्यकर्त्यांची कार्यक्रमस्थळी प्रचंड घोषणाबाजी

उत्तम बाबळे

नांदेड :- ‘उडान’- उडे देश का आम नागरिक’ या योजनेद्वारे देशाचे अनेक भाग हवाई मार्गाने जोडून देशाची एकात्मता आणखी दृढ करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून भारताकडे हवाई क्षेत्राच्या विकासाबरोबरच पर्यटन, औद्योगीक, व्यापार, शिक्षण अशा क्षेत्रातील अमर्याद संधी खुल्या होतील असा विश्र्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

‘उडान’ या केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी क्षेत्रीय संपर्क योजनेतील नांदेड–हैद्राबाद विमान सेवेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओलिंकीगद्वारे करण्यात आला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपरोक्त विधान शिमला येथे व्यक्त केले.

यानिमित्ताने नांदेड येथील गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर शानदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याच्या ग्रामविकास, महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे, कामगार, भुकंप, पुनर्वसन, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण, जि. प. अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार जवळगावकर, नांदेडच्या महापौर शैलजा स्वामी, आ.अमर राजूरकर, आ.डी. पी. सावंत, आ.हेमंत पाटील, आ.डॉ. तुषार राठोड, एअरपोर्ट ॲथोरिटी आँफ इंडियाचे किशनलाल शर्मा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर नांदेड-हैद्राबाद विमानाच्या प्रवाशांना शुभेच्छा देऊन, विमान हैद्राबादकडे रवाना करण्यात आले.

प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते नांदेड-हैद्राबाद विमानसेवेसह, शिमला –दिल्ली, कडप्पा-हैद्राबाद या विमानसेवांचाही प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी बोलताना प्रधानमंत्री मोदी यांनी परवडेल अशा दरात हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध झाल्याने, देशातील नागरिकांना आपल्या विविध क्षमतांचा विकास करण्याची संधी मिळेल. यामुळे देश विकासाच्या वाटेवर अग्रेसर होईल. उडानमध्ये सामान्य नागरिकांना हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. देशाचा काना-कोपरा जोडला जाईल. यातून देशाची एकात्मता आणखी दृढ होईल. यातून पर्यटन, औद्योगीकरण, व्यापार, शिक्षण अशा क्षेत्रातील अमर्याद संधीही खुल्या होतील. नांदेड, अमृतसर आणि पाटणा या शिख धर्मियांच्या तीर्थस्थळांसाठी विमानसेवा सुरु करण्याने जगभरातील शिखबांधव या सेवेला चांगला प्रतिसाद देऊ शकतात, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमान कंपन्यांना सुचित केले.

नांदेड च्या कार्यक्रमात बोलताना ना.पंकजा मुंडे म्हणाल्या की, देशाच्या प्रगतीत सामान्य नागरिकांना केंद्रीत ठेवून उडान या संकल्पनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालना दिली आहे. केवळ पायाभूत सुविधांचा विकास नव्हे, तर त्या सुविधांचा सामान्य नागरिकांसाठी वापर होणे आवश्यक आहे. या योजनेमुळे विमान प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येईल. नांदेड येथून सुरु होणाऱ्या विमानसेवेचा फायदा लगतच्या जिल्ह्यांनाही होणार आहे. पर्यटन क्षेत्राच्या विकासासह, या परिसरातील प्रत्येक क्षेत्रासाठी विमानसेवा महत्त्वाची ठरणार आहे.

ना.संभाजी पाटील-निलंगेकर म्हणाले की, विमानसेवा केवळ खास वर्गासाठी असू नये, तर ती देशातील आम नागरिकांनाही ही सेवा उपयुक्त ठरावी, अशी ही योजना आहे. या विमान सेवेचा नांदेडसह अन्य जिल्ह्यांना निश्चितच फायदा होणार आहे. या विमानसेवेचा भविष्यात चांगला विस्तारही होईल, असेही त्यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोक चव्हाण यांनीही या विमान सेवेमुळे नांदेडमधील पर्यटन, औद्योगीक क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल. मराठवाड्याच्या विकासाच्यादृष्टीने विमान सेवा उपयुक्त ठरेल, असा विश्र्वास व्यक्त केला.

सुरवातीला एअरपोर्ट ॲथॅारिटी आँफ इंडियाचे शर्मा यांनी प्रास्ताविक केले.तर नायब तहसिलदार स्नेहलता स्वामी यांनी सुत्रसंचालन केले. कार्यक्रमास ट्रू-जेट विमान कंपनीचे अधिकारी, रिलायन्स विमानतळ व्यवस्थापन कंपनीचे अधिकारी, विमान प्रवाश्यांसह, विविध पक्षांचे पदाधिकारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रेयवादावरुन भाजपा – काँग्रेस कार्यकर्त्यांची कार्यक्रमस्थळी प्रचंड घोषणाबाजी

नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंघजी विमान तळावर झालेल्या कार्यक्रम प्रसंगी ” उडान ” चे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकारचे आहे म्हणत भाजपा कार्यकर्त्यांनी ” मोदी – मोदी, नरेंद्र मोदी जिंदाबादचे ” नारे दिले तर सदरील विमानतळ हे खा.अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांतून झाल्याने ही सेवा उपलब्ध होऊ शकली म्हणत काँग्रेस कार्यकर्त्यांनी ” खा.अशोक चव्हाण जिंदाबाद ” चे नारे दिले.दोन्ही बाजूंनी झालेल्या प्रचंड घोषणाबाजीमुळे वातावरण बरेच तापले होते.परंतू उपस्थित सर्व नेत्यांनी व पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थितीवर शांतता निर्माण करता आली आणि कार्यक्रम यशस्वीरित्या उत्साहात पार पडला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या जागी विक्रम कुमार नवे पालिका आयुक्त

News Desk

राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असतील तर राजभवनात जाऊन सांगावं लागेल, राऊतांचा पाटलांना टोला

News Desk

काँग्रेस आता अ‍ॅक्शन मोडमध्ये, २ दिवसांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली!

News Desk