HW News Marathi
महाराष्ट्र

‘काँग्रेसमुळे सत्तेत आहात विसरु नका’, अमोल कोल्हेंवर काँग्रेसचा निशाणा!

मुंबई | ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर आहेत’. हे गेल्या काही तासांमधलं सर्वाधिक वादग्रस्त विधान आपण पाहतोय. त्याचबरोबर “लॉकडाऊनमुळे कार्यक्रम होत नव्हते म्हणून बऱ्याच जणांना व्यक्त व्हायचं होतं. राजकारण हे फक्त निवडणुकांपुरतं असणं गरजेचं आहे. निवडणुका संपल्या की राजकारण संपलं पाहिजे. वयस्कर नेत्याने असं पोरकटपणाने वागणं याचं मला आश्चर्य वाटतं” असं खासदार अमोल कोल्हे शिरुरमध्ये बोलले होते. त्यांचा रोख शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे होता. याला प्रतिउत्तर म्हणून शिवसेना प्रवक्ता किशोर कान्हेरे यांनी अमोल कोल्हेंना सल्ला दिला, ‘ज्या उद्धव साहेबांमुळे आपल्याला आणि आपल्या पक्षाला सत्तेची फळे चाखायला मिळाली किमान त्यांना तरी विसरु नका.’ असा टोला त्यांनी लगावल्यावर या वादात आता काँग्रेस नेत्यांनीपण उडी घेतली आहे.

त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. “काँग्रेसमुळे आपण सत्तेत आहात, याचा तसा विसर पडत नाही म्हणा, पण आठवण दिलेली बरी” असं खोचक वक्तव्य काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केल्यानंतर मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत आली? असा सवाल शिवसेनेने विचारला होता. आणि त्यानंतर आता या नाटयात काँग्रेसची भर पडली.

“खासदार अमोल कोल्हे म्हणतात पवार साहेबांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, शिवसेना म्हणते आमच्या सहकार्याने राष्ट्रवादी सत्तेत, पण कृपा करुन दोन्ही पक्षांना याचा विसर पडू देऊ नका, काँग्रेसमुळे आपण सत्तेत आहात. तसा विसर पडत नाही म्हणा, पण आठवण दिलेली बरी” असं ट्वीट करत डॉ. राजू वाघमारे यांनी या वादात भर टाकली. या वादापूर्वी अमोल कोल्हेंनापण तोडीसतोड उत्तरे मिळाली. “उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दस्तुरखुद्द शरद पवार साहेब सतत उद्धव साहेबांशी सल्ला मसलत करत राज्य कारभार चालवत आहेत. तुम्ही कशाला फार विचार करता, तेवढी तुमची कुवत पण नाही आणि क्षमता पण, दिग्दर्शकाने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचा आणि अभिनय करून पोटापाण्याचे पहा, फार डोके चालवू नका” अशा शब्दात किशोर कान्हेरे यांनी अमोल कोल्हे यांच्यावर हल्लाबोल चढवला.

नेमका वाद काय?

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. नारायणगाव आणि खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते. मात्र त्यापूर्वीच म्हणजे कालच शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हे उद्घाटन उरकून टाकलं. हा रस्ता आपण मंजूर केला असून, आपणच याचं भूमीपूजन केलं होतं. अमोल कोल्हे केवळ शो बाजी करत आहेत, असा दावा आढळरावांनी केला होता. त्यामुळे त्यांनी रस्त्याचे उद्‌घाटन करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

आढळरावांचा दावा काय?

खेड घाट बायपासच्या कामाच्या श्रेयाची चोरी करुन वचनपूर्ती करण्याचं थोतांड केल्याचा आरोप, शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी केला. इतकंच नाही तर त्यांनी शिवसैनिकांसमवेत उद्घाटन करत बाह्यवळण मार्ग प्रवाशांसाठी खुला केला.खेड घाटातील बायपासचे काम बंद पडले होते. त्यावेळी आपण केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे आज अखेर बाह्यवळणाचे काम झालं आहे. अशा वेळी अचानक उद्घाटन करण्याचा घाट खासदार कोल्हे यांनी घातला. या कामासाठी कुठलेच योगदान नसताना त्या कामाचे श्रेय घेण्याचे काम करत आहेत, असा आरोप शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिहार देवेंद्रजीनी आणले महाराष्ट्राला पण देवेंद्रजीच पाहिजे..! 

News Desk

‘राज्यात जे सध्या सुरु आहे ते विरोधकांच्या नैराश्याचं प्रतिक’, सरनाईकांवरील कारवाईवर पवारांची प्रतिक्रिया 

News Desk

जितेंद्र आव्हाडांची शरद पवारांवर सिरीज’साहेब माझा विठ्ठल ‘

News Desk