Site icon HW News Marathi

पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा! – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

अकोला  ।  जिल्ह्यात दोन-तीन दिवसापासून अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) व गारपीट यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सोमवारी पाहणी केली. पातूर व बाळापूर तालुक्यातील बेलुरा खुर्द व वाडेगाव येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी कृषीमंत्री सत्तार यांनी संवाद साधला. तसेच अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

जिल्ह्यातील अवकाळी व गारपीटीने नुकसान झालेल्या बेलुरा खुर्द व वाडेगाव गावांतील पाहणी दौरा आज पार पडला. विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे,  उपविभागीय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी, तहसिलदार सैय्यद ऐसामुद्दीन, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक आदी उपस्थित होते.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, दोन-तीन दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे निंबू, कांदा, गहू, टरबुज, पपई व भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई कशी देता येईल याबाबत शासन सहानुभूतीने विचार करेल. पंचनाम्यांअभावी कोणत्याही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता कृषी विभाग व महसूल विभागाने घ्यावी, असेही निर्देशही त्यांनी यावेळी दिले. लिंबू फळबागांना पिक विमा योजनेत समावेश करण्यासाठी आपण शासनस्तरावर प्रयत्न करु, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

दरम्यान बेलुरा खुर्द येथील शेतकरी प्रल्हाद आत्माराम डांगे, पवन सुधाकर देशमुख किसन हरभाऊ नाकट व अमित देशमुख यांच्या शेतातील कांदा पिकांचे तर कृष्णराव देशमुख व सुधाकर देशमुख यांच्या शेतातील लिंबु व इतर फळपिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तसेच दिग्रस येथील गजानन अनवाने व पंचफुला बळीराम अनवाने येथील लिंबु फळबागाचे तर हिंगणा येथील अनंत देशमुख येथील लिंबु फळबागाचे पंचनामा पूर्ण झाले आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी बांधावर जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. शासन नियमाने भरपाई देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Exit mobile version