Site icon HW News Marathi

लम्पी चर्म रोगाचे लक्षणे दिसताच पशुधनावर उपचार केल्यास रोग लवकर बरे होण्यास मदत! – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

मुंबई । पशुपालकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले तरी त्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. लक्षणे दिसताच उपचार केले तर लम्पी रोग (Lumpy Disease) लवकर बरे होण्यास मदत होते. बहुतांश मृत्यू हे संबंधित आजारी पशुधनावर तीन ते चार दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटल्यानंतर उपचारास सुरुवात झाल्यामुळे झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

सिंह म्हणाले, रोगाचा उपचार लक्षणे दिसल्यानंतर वेळेतच सुरू झाल्यास, मृत्यूची शक्यता अत्यंत कमी असून बहुतांश पशु उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. तरी सर्व पशुपालकांनी लम्पी चर्म रोगाच्या संभाव्य  लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.

सिंह म्हणाले राज्यामध्ये काल अखेर 30  जिल्ह्यांमधील  एकूण 1796 गावांमध्ये फक्त 24,466 जनावरांमध्ये लम्पी चर्म रोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 24,466 बाधित पशुधनापैकी एकूण 8911 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 81.62 लक्ष लस  उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून बाधित क्षेत्राच्या ५ किमी परिघातील 1796 गावातील 40.34लक्ष पशुधन आणि परिघाबाहेरील 17.80 लक्ष पशुधन  अशा एकूण 58.14 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे व गोशाला व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने पशुधन असलेल्या ठिकाणी पुढील लसीकरण सुरू आहे. तसेच शासनाने महाराष्ट्रातील प्रत्येक पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील भागात लसीकरण करण्यासाठी परवानगी दिली असून, त्यासाठी लस देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.   आता सर्व 4850 पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रात लसीकरण सुरू असल्याचे सिंह यांनी सांगितले.

Exit mobile version