Site icon HW News Marathi

लम्पी चर्म रोग बाधित पशुधनाच्या औषधांचा सर्व खर्च शासन करणार! –  राधाकृष्ण विखे पाटील

पुणे | राज्यात लम्पी (Lumpy skin disease) रोगावर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून लम्पी बाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येईल, तसेच जिल्हास्तरावर उपचारासाठी आवश्यक औषधांची ‘ड्रग्ज बँक’ देण्यात येईल, असे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले.

पशुसंवर्धन आयुक्तालय येथे दूरदृश्‍य प्रणालीद्वारे आयोजित राज्यस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन डॉ. डी. डी परकाळे आदी उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, राज्यासाठी एका आठवड्यात ५० लाख लसमात्रा उपलब्ध होणार आहेत. लसीकरणासाठी खाजगी पशुवैद्यक आणि पशुवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात यावी. खाजगी पशुवैद्यकांना आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. विद्यार्थ्यांना निवास व अनुशंगिक व्यवस्था आणि प्रति लसीकरण तीन रूपये प्रमाणे मानधन सुरू करावे. जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाव पातळीवर भेटी देवून लम्पी चर्म रोगाबाबत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा.

राज्य शासनाने वेळेत उपाययोजना केल्याने हा आजार नियंत्रणात आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि पशुसंवर्धन विभागाच्या एकत्रित प्रयत्नातून लसीकरणाचा वेग वाढविण्यात आल्याने देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत या आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश आले आहे. आजारावर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून पाच किलोमीटर परिसरातील पशुधनासोबतच राज्यभरातील पशुधनाचे लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे. एका दिवसात एक लाख पशुधनाचे लसीकरण करण्यात येत असून येत्या काळात हा वेग अधिक वाढेल, असा विश्वास विखे पाटील त्यांनी व्यक्त केला.

विखे पाटील पुढे म्हणाले, मृत जनावरांसाठी गाय ३० हजार, बैल २५ हजार आणि वासरू १६ हजार याप्रमाणे मदत पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कृती दल आणि राज्य पातळीवरील हेल्पलाईन नंबर कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हा पातळीवर देखील हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. म्हशींवर या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत नसल्याने म्हशींच्या संदर्भातील केंद्र सरकारची मंजुरी घेऊन बंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात येईल. पशुपालकांनी भयभित न होता जनावरांमध्ये लम्पी चर्म रोगाची लक्षणे आढळल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रधान सचिव गुप्ता यांनी राज्यभरात पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आलेल्या औषध पुरवठा व इतर उपाययोजनांची माहिती दिली.

पशुसंवर्धन आयुक्त सिंह म्हणाले, शासन सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देत असून पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी गावपातळीवर जनजागृतीवर भर द्यावा. लसमात्रा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून अधिक लसीकरण असलेल्या जिल्ह्यांना मागणीनुसार पुरवठा करण्यात येईल. या बैठकीस दूरदृश्‍य प्रणालीद्वारे राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version