Site icon HW News Marathi

पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी १६१ गावांच्या क्लस्टर एसटीपी प्रकल्पाबाबत समन्वयाने नियोजन करा! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई। नवनिर्मित इचलकरंजी महानगपालिका क्षेत्रातील विकास कामांना विशेषतः हातकणंगले लोकसभा मतदार संघातील नगरपालिकांमधील बाजारपेठेतील महत्त्वाचे रस्ते विकास, पाणीपुरवठा तसेच या परिसरातील वस्त्रोद्योगासह, पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक ते प्रय़त्न केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बुधवारी (९ नोव्हेंबर) येथे सांगितले.

ऐतिहासिक माणगाव अस्पृश्य परिषदेच्या शताब्दी महोत्सवासाठी आणि वाटेगाव (ता. शिराळा) येथील अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी उत्कृष्ट नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पंचगंगा नदीकाठच्या १६१ गावांच्या सांडपाणी प्रक्रियेसाठी क्लस्टर एसटीपी पद्धतीने आराखडे तयार करण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

हातकणंगले मतदारसंघातील  ग्रामीण आणि नागरी प्रश्नांबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मंत्रालयात झालेल्या बैठकीस कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार धैर्यशील माने, राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे यांच्यासह विविध विभागांचे सचिव स्तरीय अधिकारी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार, इचलकरंजी महानगपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख आदी उपस्थित होते. तसेच सांगली आणि विविध नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, इचलकरंजी ही नवनिर्मित महानगरपालिका आहे. या महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांसह या परिसरातील विविध नगरपालिकांमधील विकास कामांना विविध योजनांमधून निधी देताना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. या विविध कामांसाठी, प्रकल्प आणि योजनांसाठी वेळेत प्रस्ताव सादर केले जावेत. प्रत्यक्ष कामांमध्येही दर्जावर लक्ष दिले जावे. या परिसरातील पर्यटन संधी विषयी आराखडा तयार करण्यासाठी पर्यटन विभागाने तज्ज्ञांची मदत घ्यावी. शिवराज्य भवन या योजनेतील कामांसाठी बांधकाम विभागाच्या सहभागातून एक टाईप प्लॅन तयार करून घ्यावा. जेणेकरून सर्वत्र एकाच प्रकारच्या इमारती व सुविधा निर्माण करता येतील. नगरपालिका क्षेत्रातील बाजारपेठांधील मुख्य बाजारपेठांच्या रस्तांचा एक मॉडेल पद्धतीने विकास करता येईल. त्यासाठी सुशोभीकरणासह उत्कृष्ट नियोजन करण्यात यावे,अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

पालकमंत्री केसरकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनाच्या मोठी संधी आहेत. विशेषतः गडकोट-किल्ल्यांच्या अनुषंगाने एक आराखडा तयार करता येईल. सातारा आणि कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा मोठा आहे. अन्य राज्यांमध्ये अशा पद्धतीने पर्यटन प्रकल्प राबविले जातात. त्याच धर्तीवर या दोन्ही जिल्ह्यांच्या समावेशासह प्रकल्प राबविल्यास मोठ्या पर्यटन क्षेत्राचा विकास होईल. त्यातून रोजगार संधी निर्माण होतील.

खासदार माने यांनी हातकणंले लोकसभा मतदारसंघातील कोल्हापूर जिल्ह्यातील आणि सांगली जिल्ह्यातील विविध नगरपालिका तसेच क्षेत्रातील मुद्द्यांची मांडणी केली. त्यांनी रोजगार हमी योजना तसेच रस्त्यांसह पायाभूत विकासाबाबतची मांडणी केली.

यावेळी हातकणंगले नगरपंचायतीसह, हुपरी, शिरोळ या नगरपालिकांना प्रशासकीय इमारतींसाठी निधीची उपलब्धता, इचलकरंजी महानगरपालिकेचा आकृतीबंध, शहरातील संभाजी महाराज पुतळा उभारण्याचा प्रकल्प, सेफ सिटी प्रकल्पातील कॅमेरे बसविण्याचा पुढचा टप्पा,  खिद्रापूर मंदिराच्या समावेशासह पर्यटन आराखडा तयार करणे, पन्हाळा-शाहूवाडी-आंबा टूरिस्ट सर्कीट, जयसिंगपूरसह विविध नगरपालिकांसाठी मंजूर रस्ते, सांडपाणी निचरा प्रकल्पांसाठीचा निधी आणि आराखडे,नगरपालिकामध्ये बाजारपेठांतील रस्त्यांचा विकास, इस्लामपूर, आष्टा येथील भुयारी गटारे, समाजकल्याण विभागांच्या संविधान भवन, तसेच शिवराज्य भवन, शिराळा येथील संभाजी महाराजांचा भुईकोट किल्ल्याचा विकास याबाबतची चर्चा झाली.

वस्त्रोद्योग उद्योजकांच्या अडचणी तसेच वीज बिल आणि छोट्या यंत्रमाग धारकांच्या प्रश्नावर वस्त्रोद्योग, ऊर्जा विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.

Exit mobile version