Site icon HW News Marathi

“शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही”, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही

मुंबई | अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) झालेल्या  नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना (farmers) मदत केली आहे, आजही आपण मदत करीत असून हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा आज (16 मार्च) सकाळी विधानसभेत उपस्थित केला, त्यावर मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

 

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात काल नांदेड आणि नाशिक जिल्हाधिकाऱ्यांशी  बोललो आहे, त्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यानुसार आज अर्धापूर आणि मुदखेड  या तालुक्यात नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामे करण्याचे काम सुरु आहे तर नाशिक जिल्ह्यात देखील नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू आहेत. या नुकसानीचा अहवाल लवकरच शासनाला प्राप्त होईल.  गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झालेले आहेत, असे सांगून कालपासून ज्या ठिकाणी पाऊस  पडत आहे, त्या भागात देखील  पंचनामे  सुरु असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Exit mobile version