Site icon HW News Marathi

पर्यावरणपूरक होळीचे आणि नैसर्गिक रंगाच्या वापराचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई | ‘होळीचा सण निसर्गाची ओढ निर्माण करणारा असतो. त्यातून पर्यावरणाविषयी जागरुकता वाढीस लागावी. या सणांच्या उत्साहातून आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदांच्या क्षणांची उधळण व्हावी, हे सण सामाजिक सलोखा, शांतता आणि सुव्यवस्था यांचे भान राखून साजरे करावेत. होळी (Holi) पर्यावरणपूरक पद्धतीने आणि धुलिवंदन सण नैसर्गिक रंगांचा वापर करून साजरा करावा, असे आवाहन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, होळीचा हा पारंपरिक सण आपल्याला निसर्गाकडे घेऊन जातो. या सणातून पिढ्यान् पिढ्यांना पर्यावरणाचे जतन-संवर्धनाची शिकवण दिली जाते. यंदाही या सणातून आपल्यामध्ये जागरुकता वाढीस लागणारे उपक्रमांचे आयोजन व्हावे. धुलिवंदनाच्या रंगाची उधळण होते. हे रंग आपल्याला निसर्गाकडेच घेऊन जातात. या रंगाप्रमाणेच आपल्या सर्वांच्या आयुष्यात परस्पर स्नेह-प्रेमांच्या रंगांची बहार निर्माण व्हावी. या सणांच्या उत्सव-उत्साहातून सुख, समृद्धी आणि आनंदांच्या क्षणांची उधळण व्हावी, हीच मनोकामना.

Exit mobile version