Site icon HW News Marathi

‘हर घर तिरंगा’ कार्यक्रम यशस्वी करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुणे | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tricolor Campaign) कार्यक्रम घराघरात पोहोचविण्यासाठी सर्व यंत्रणेचा सहभाग घ्यावा. स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी यांचा सहभाग घेत ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रम यशस्वी करावा. घरावर तिरंगा फडकविण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पाऊस, अतिवृष्टी, पीक पाहणी आणि विकासकामांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, विविध विभागांचे राज्य आणि विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त राव यांनी बैठकीत पुणे विभागातील विविध विषयांबाबत सादरीकरण केले. विभागात ३१ जुलैपर्यंत सरासरीच्या ८१ टक्के पाऊस झाला आहे. विभागातील मोठ्या प्रकल्पात ७१ टक्के, मध्यम प्रकल्पात ६५ आणि लघू प्रकल्पात ४६ टक्के पाणीसाठा झाला आहे. ४४ तालुक्यातील १५० महसूली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या ७ व्यक्तींच्या वारसांना २८ लाख रुपयांची मदत वितरीत करण्यात आली आहे. २ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रात शेतीपिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीस माजी मंत्री तानाजी सावंत, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार दिलीप मोहिते पाटील, माधुरी मिसाळ, संग्राम थोपटे, महेश लांडगे, सुनिल कांबळे, अशोक पवार, चेतन तुपे, सुनील टिंगरे, भीमराव तापकीर, राहूल कुल, सिद्धार्थ शिरोळे, संजय जगताप, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अंकुश शिंदे, विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विभागातील इतर अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते. प्रारंभी पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे आगमन झाल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांचे विभागीय आयुक्त राव यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रशासनाच्यावतीने स्वागत केले.

पोषकतत्वयुक्त आहार वाटपाचा शुभारंभ

पुणे जिल्हा परिषदेंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्यावतीने अंगणवाडी केंद्रातून पोषकतत्वयुक्त आहार अंतर्गत हॉर्लिक्स वाटपाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यासाठी जिल्हा परिषदेने कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत हिंदुस्थान युनिलीव्हर सोबत सामंजस्य करार केला असून कंपनी वर्षभर मोफत हॉर्लिक्स पुरवणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात बालकांना हॉर्लिक्सचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील बालकांच्या आहारामध्ये आवश्यक त्या प्रमाणात सुक्ष्म पोषकतत्वे, जीवनसत्वे आदी पोषक तत्वांचा समावेश व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

कोरोनामुक्त गाव स्पर्धेतील यशस्वी गावांना पुरस्कार

राज्य शासनाने सुरू केलेल्या कोरोनामुक्त गाव स्पर्धा योजनेंअंतर्गत माण, ता. मुळशी आणि सपकळवाडी, ता. इंदापूर या ग्रामपंचायतींनी कोविड व्यवस्थापनामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल या गावांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते कोरोना मुक्त गाव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोरोनामुक्तीसाठी कुटुंब सर्वेक्षण पथक, विलगीकरण कक्ष, कोरोना तपासणी, कोविड हेल्पलाईन पथक आदींच्या माध्यमातून या गावांनी उत्कृष्ट काम केले आहे.

वेटलिफ्टर हर्षदा गरुडचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

ग्रीस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविणाऱ्या वडगाव मावळ येथील हर्षदा गरुडचा मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सत्कार केला आणि तिला पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. हर्षदाने जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टींग स्पर्धेतील ४५ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकाविले आहे. या स्पर्धेत भारताला प्रथमच सुवर्ण पदक मिळाले.

Exit mobile version