Site icon HW News Marathi

रूग्णालय सल्लागार समिती तत्काळ गठित करणार! – मुख्यमंत्री

मुंबई । राज्यातील रूग्णालयातील रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समस्या सोडविण्यासाठी रूग्णालय सल्लागार समिती तत्काळ गठित करण्यात येईल. विधानभवन परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या सुभाष देशमुख या शेतकऱ्याच्या उपचारात कसूर होणार नाही, त्यांचे प्राण वाचविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde )  यांनी विधानसभेत दिली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील सुभाष देशमुख यांनी अधिवेशन कालावधीदरम्यान विधिमंडळ परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात तसेच मुंबईतील रूग्णालयाच्या स्थितीसंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यासंदर्भात तत्काळ निधी उपलब्ध करून देणे, सल्लागार समिती गठित करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शासनास दिले.

मुख्यमंत्री  शिंदे म्हणाले, मुंबईतील रूग्णालयात रूग्णांच्या नातेवाईकांना बसण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता तसेच त्यांच्यासंबंधीत इतर समस्या सोडविण्यासाठी सल्लागार समिती तत्काळ गठित करण्यात येईल. या समितीत स्थानिक लोकप्रतिनिधींचा समावेश असेल.

Exit mobile version