Site icon HW News Marathi

प्रत्येक नागरिकाने ‘घरोघरी तिरंगा’ अभियानात भाग घ्यावा!– मुख्य सचिव

मुंबई। स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात यावर्षी राज्यात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविण्यात येत असून, या अभियानात राज्यातील सर्व जनतेने हिरीरीने भाग घ्यावा, असे आवाहन मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव (Manu Kumar Srivastava) यांनी केले. शासनाने यासाठी अतिशय सूक्ष्म नियोजन केले असल्याचेही मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले. मंत्रालयात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) मार्फत उभारण्यात आलेल्या प्रदर्शन व विक्री स्टॉलचे मुख्य सचिवांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अपर मुख्य सचिव तथा महासंचालक दीपक कपूर, उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर, ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रविण जैन, अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत पालघर जिल्ह्यातील प्रभाग संघाच्यावतीने मंत्रालयात तीन दिवसांकरिता ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानांतर्गत प्रदर्शन व विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे मंत्रालयातील स्टॉल हे महिला बचत गटातील आदिवासी महिलांचे आहेत. हे प्रदर्शन सोमवार ( 8 ऑगस्ट) सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. या प्रदर्शनात राष्ट्रीय तिरंगा ध्वजासह स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने विविध वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. ‘घरोघरी तिरंगा’ अभियानात राज्यातील महिला बचत गटाच्या सर्व महिला सहभागी असून या बचत गटातील महिला तिरंगा ध्वजाची निर्मिती आणि विक्रीही करीत आहेत. शासनाने या संपूर्ण अभियानाकरिता ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे.

Exit mobile version