Site icon HW News Marathi

सीमाभागातील मराठीभाषक बांधवांचा आधारवड कोसळला; एन.डी. पाटलांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

मुंबई | महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटीलसाहेब म्हणजे सामान्य माणसाचा संघर्षाचा कृतीशील विचार होता. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत ते संघर्ष करीत राहिले. त्यांच्या निधनाने शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

“सीमाभागातील मराठीभाषक बांधवांचा आधारवड कोसळला आहे. एन. डी. पाटील हे एक निर्भिड, नि:स्पृह, निडर नेते होते. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून त्यांनी काम केले. वयाच्या नव्वदाव्या वर्षीही रस्त्यावर उतरुन संघर्ष करणाऱ्या एन. डी. पाटील यांचे निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची मोठी हानी आहे”, असे अजित पवार म्हणाले.

सीमाभागातल्या प्रत्येक कुटुंबाची हानी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारमध्ये त्यांनी सहकार मंत्री म्हणून काम केले. तसेच आमदार म्हणून काम केले. विधानमंडळातील प्रत्येक क्षण आणि प्रत्येक शब्द हा वंचित बांधवांना हक्क मिळवून देण्यासाठी उपयोगात आणला. एन. डी. पाटील हे आमच्या कुटुंबातील सदस्य होते. त्यांचे निधन हे महाराष्ट्रातल्या, सीमाभागातल्या प्रत्येक कुटुंबाची हानी आहे, असे सांगतानाच अजित पवारांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

Exit mobile version