नागपूर | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपले प्राण गमावले. तर काही मुलांनी आपले दोन्ही पालक गमवल्याने ही मुलं अनाथ झाली. या अनाथ मुलांसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे सरसावले आहेत. कोरोनानं छत्र हरवलेल्या अनाथ मुलांसाठी काही सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. अशावेळी सरकारी पातळीवर याबाबत काही ठोस निर्णयाची अपेक्षा सर्वांना आहे.
या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्ट, हिंगणा यांनी कोरोनामुळे अनाथ झालेल्या 100 मुलांना मायेचा आधार दिलाय. तर देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व मुलांच्या खर्चाची जबाबदारी घेतल्याचं जाहीर केलं आहे.
फडणवीसांनी 100 अनाथ मुलांना मदतीचा हात दिला
नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी प्रमुख असलेल्या श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सोबत’ हा उपक्रम राबवण्यात आला आहे. कोरोना काळात आई-वडील गमावलेल्या 100 मुलांना आधार देण्याचं काम या ट्रस्टद्वारे करण्यात येत आहे. त्याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी या मुलांची संपूर्ण जबाबदारी आपण घेतो.
ट्रस्टने या मुलांची सर्व व्यवस्था राबवावी, मी संपूर्ण पाठबळ देतो, असं म्हटलं आहे. त्याचबरोबर कुणाला हा विचार संकुचित वाटेल. पण मी ही एक लोकप्रतिनिधी आहे. मलाही मतदारसंघ आहे. या 100 मुलांव्यतिरिक्त दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात जेवढे असे मुलं असतील त्या सर्वांची जबाबदारी मी घेईन, असं आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिलं आहे.
‘इतरांकडून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार’ – देवेंद्र फडणवीस
इतकंच नाही तर हा प्रकल्प पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्ही सांगाल त्या ठिकाणी मी जाईन. ही व्यवस्था सुरु ठेवण्यासाठी दानशूर लोकांना बोलेन आणि त्यांच्याकडून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करेन, असं आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिलं आहे.
या संस्थेकडे आलेल्या पहिल्या 100 बालकांच्या नोंदणीचे पालकत्त्व मी स्वीकारत आहे. याशिवाय, माझ्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून जी नोंदणी होईल, त्यांचीही संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो आहे.https://t.co/UGMDeUPVOj https://t.co/D0jWL1Tu0D
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 27, 2021
कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी केंद्रिय मंत्री स्मृती इराणींचं आवाहन
कोरोनामुळे अनाथ झालेल्या या मुलांच्या पुढील पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांची बेकायदेशीररित्या दत्तक प्रक्रियाही सुरू झाल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांनी आज देशातील जनतेला महत्त्वपूर्ण आवाहन केले. कोरोनामुळे अनाथ झालेली मुले तसेच त्यांची काळजी घेण्यासाठी कुटुंबातील जवळचे कुणी नसेल तर त्या मुलांबाबत पोलिसांना माहिती द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी केले आहे.
कोरोना महामारीत अनेक कुटुंबे उध्वस्त झाली. काही कुटुंबांमध्ये कर्ता पुरुष व पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अशा परिस्थितीत त्या दाम्पत्यांची मुले अनाथ झाली आहेत. त्यांच्या जबाबदारीचा, पालनपोषणाचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा मुलांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करीत केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी आज एकापाठोपाठ एक ट्विट्स केले. या माध्यमातून त्यांनी अनाथ मुलांच्या योग्य पुनर्वसनासाठी एक विशेष मोहिमच हाती घेतली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.