बुलडाणा । कोरोना विषाणूने पूर्ण जगाला आपले अस्तित्व दाखवून जगच लॉकडाऊन केले. जिल्ह्यातही नागरिकांनी कोरोनाची धास्ती घेतली. प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोनाचे अस्तित्व बंदीस्त करण्यात यश मिळत आहे. त्यामुळे बरे होण्याची मिळतेच हमी.. कोरोना होतोय कमी.. ही परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
#WarAgainstVirus
बरे होण्याची मिळतेय हमी, #कोरोना होतोय कमी! #बुलडाणा जिल्ह्यात पाच रूग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज➡ विशेष वृत्त- https://t.co/leXK7dUyZQ pic.twitter.com/MscUt5E4zq
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 20, 2020
कोरोनाबाधित त्या मृत व्यक्तीच्या अहवालानंतर चार रूग्ण पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर चिखली, चितोडा ता. खामगांव, शेगांव, देऊळगांव राजा व सिंदखेड राजा येथील संशयित व्यक्ती कोरोना बाधित आले. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. स्त्री रूग्णालयातून जिल्ह्यात असलेल्या २१ कोरोनाबाधित रूग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर २० रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यामधून १७ एप्रिल रोजी तीन कोरोनाबाधित रूग्णांना दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर रूग्णालयातून सुटी देण्यात आली. यानंतर १७ रूग्ण रूग्णालयात उपचार घेत होते, त्यानंतर आज (२० एप्रिल) पुन्हा चार रूग्णांचे दुसरा अहवाल निगेटिव्ह आला. तसेच एका आधीच्या कोरोनाबाधिताचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आज त्या व्यक्तीचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे रूग्णालयातून आज रोजी पाच रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात या पाच रूग्णांसह डिस्जार्ज देण्यात आलेल्या रूग्णांची संख्या ८ झाली आहे. सध्या रूग्णालयात १२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे आज पाचही रूग्णांचे दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. त्यांना आनंदाने जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचे दाखल केल्यापासून १४ व १५ दिवसानंतरचे दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन्ही तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने चिखली, चितोडा, दे.राजा व शेगांव येथील रूग्णाला १७ दिवसानंतर डिस्जार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचारात बरे झाल्याने रुग्णांच्या चेहऱ्यावर तर आनंद होताच, मात्र त्याला बरे करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेले कोरोना संसर्ग वार्डात काम करणारे डॉक्टर, पारिचारिका, कर्मचारी यांच्या चेहऱ्यावरुनही आनंद ओसंडून वाहत होता.
त्यामुळे या सर्वांनी टाळ्या वाजवून संबंधित कोरोनाबाधित रूग्ण बरे झाल्याचा आनंद व्यक्त केला. यानंतर जिल्हाधिकारी यांनी डिस्चार्ज पेपर देवून, रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. बुलडाणा येथे २८ मार्च रोजी एका संशयीत व्यक्तीचा उपचारादरम्यान रूग्णालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट कोरोनाबाधित आला होता. त्यानंतर त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना दाखल करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. या पाचमध्ये बरे झालेल्या एकाचा समावेश त्या मृत व्यक्तीच्या हायरिस्क संपर्कातील आहे. तसेच उर्वरित चार दिल्ली येथील मरकज कार्यक्रमाच्या संपर्कातील आहेत. तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वार्डात दाखल करुन या सर्वांवर उपचार करण्यात आले. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या रुग्णांवर तसेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात तपासणी, उपचार करण्यात आले. कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तींचे दोन्ही स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पहिला तपासणी अहवाल निगेटिव्ह असल्याचा, तर दुसरा तपासणी रिपोर्टही निगेटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. दोन्ही अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर बाधित रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्याला आज डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले.
कोरोनाच्या या जीवघेण्या आजारातून वाचलेल्या सर्व कोरोना निगेटिव्ह रूग्णांचे चेहरे आनंदीत होते. सर्व मनोमन आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस यांचे आभार मानत होते. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी अजूनही लॉकडाऊनचे पालन करावे, घरातून विनाकारण बाहेर पडू नये. सर्वांनी मास्क किंवा स्वच्छ हात रूमाल चेहऱ्यावर ठेवावा. अनावश्यक बाहेर न पडता घरातच रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी यावेळी केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.