Site icon HW News Marathi

कॉपीचे प्रकार सरकारने गांभीर्याने घेऊन कडक भूमिका घ्यावी! – अजित पवार

मुंबई | अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी-मानुर (ता. पाथर्डी) येथील दहावीच्या परीक्षा (SSC Exam) केंद्रावर परीक्षार्थीना कॉपी पुरवणाऱ्या जमावाकडून लाठ्याकाठ्या घेऊन भरारी पथकावर दगडफेक करण्यात आली आहे. ते परीक्षा केंद्रच ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब अत्यंत गंभीर आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात असे कॉपीचे आणि पेपर फुटीचे प्रकार वारंवार घडत आहेत. हे प्रकार न थांबल्यास राज्‍याचे वाटोळे होईल अशी भीती व्यक्त करत सरकारने गांभीर्याने या विरोधात कडक भूमिका घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.

टाकळी-मानुरी (ता. पाथर्डी) येथे बुधवारी (15 मार्च) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास  दहावीचा भूमिताचा पेपर सुरु होता. त्यावेळी परीक्षार्थीना कॉपी पुरवणाऱ्या जमावाने परीक्षा केंद्रात जबरदस्ती प्रवेश करत भरारी पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांना धमकावून कॉपी पुरवण्यास मुभा देण्याची मागणी केली होती. अधिकाऱ्यांनी याला नकार देताच जमावाने त्यांच्यावर हल्ला केला शिवाय दगडफेक केली. पाथर्डीतील या घटनेबरोबरच जालन्यात परीक्षेदरम्यान जिल्हा परिषद शाळा, सेवली या केंद्रावर आमच्या पाल्यांना कॉपी करू द्या अन्यथा तुम्हाला जीवे मारू अशा धमक्याच केंद्रसंचालक व पर्यवेक्षकांना देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षेच्यावेळी सामुहिक कॉपी, पेपरफुटीसारखे प्रकार वारंवार घडत आहेत. असे प्रकार घडल्यास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होणार आहे. राज्याची शैक्षणिक क्षेत्रात पिछेहाट होऊन राज्याचे वाटोळे होईल. तरी या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेऊन या विरोधात कडक भूमिका घ्यावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

Exit mobile version