Site icon HW News Marathi

अडतीस गाव पाणी पुरवठा सौर प्रकल्पामुळे २५ लाखांहून अधिक पैशांची होणार बचत! – छगन भुजबळ

मुंबई। केवळ राज्यात नव्हे तर देशातील प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांसाठी पथदर्शी अशी योजना म्हणून आज येवल्यातील अडतीस गाव योजनेकडे बघितले जाते. या योजनेच्या या यशामध्ये सर्व सरपंच,गावकरी व कार्यकर्त्यांचे योगदान तितकेच महत्वाचे आहे. आता या योजनेत साकारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे योजनेच्या लाईट बिलाच्या खर्चात २५ लाखांहून अधिक पैशांची बचत होणार असून योजना यापुढील काळातही यशस्वीपणे सुरू राहील असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
देशात पथदर्शी ठरलेल्या येवल्यातील अडतीस गाव पाणी पुरवठा योजनेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी तहसीलदार प्रमोद हिले, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भांडेकर, गटविकास अधिकारी अन्सार शेख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शिवसेना तालुकाप्रमुख रतन बोरणारे,जिप माजी सभापती संजय बनकर, अडतीस गाव पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर, उपाध्यक्ष मोहन शेलार, व्यवस्थापक उत्तम घुले, अनिल दराडे,  प्रा.ज्ञानेश्वर दराडे,यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, अडतीस गाव पाणी पुरवठा योजना यशस्वी करण्याचे काम गावकरी आणि कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे देशभरात ही योजना पथदर्शी योजना ठरली आहे. लोकांच्या यशस्वी सहभागातून योजना कशा पद्धतीने यशस्वी होऊ शकते याच उत्तम उदाहरण हे अडतीस गाव पाणी पुरवठा योजनेकडे बघितल्यावर कळते. योजना यशस्वीपणे सुरू राहण्यासाठी गावांनी आपल्याकडे असलेली थकबाकी लवकरात लवकर भरावी. तसेकंग यापुढील काळातही सामूहिक प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले की, येवला तालुक्यातील अडतीस गावांसाठी सन २००८ मध्ये नळ पाणी पुरवठा योजना सुरु झाली.सद्यस्थितीमध्ये या योजनेतील पंपीग मशिनरीची दुरुस्ती करुनही वारंवार बिघाड होत असल्याने योजनेतील समाविष्ठ गावांना पाणी पुरवठा करतांना अडचणींना सामारे जावे लागत होते. योजनेतील प्रत्येक झोन मधील पाणी उपसा पर्यायी संयंत्रे अकार्यक्षम झाल्यामुळे सदर विदयुत यांत्रिकी उपकरणे नवीन बसविण्याची आवश्यकता होती. त्यामुळे पंपींग संयंत्र, समाविष्ठ गावांसाठी अतिरिक्त वितरण व्यवस्था व साठवण टाक्या बांधणे हे काम जलजीवन मिशनमधील रेट्रोफिटींग या योजनेतून घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून या योजनेसाठी जलजीवन मिशन मधील रेट्रोफिटिंग योजनेतून १० कोटी ९ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, वर्षभरात सरासरी ४ लक्ष ९४ हजार २९१ युनीट विज खर्च होत असून रुपये ४४ लक्ष ६७ हजार ६३६ / – विद्युत भारावर खर्च होत आहे. विद्युतभारावरील होणारा प्रचंड खर्च वाचविण्याकरिता येवला व ३८ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर कार्यान्वित करण्यात आली. सदर प्रकल्पातून २६८ किलोवॅट सौर ऊर्जा निर्माण होणार आहे .सदर योजनेच्या अंमलबजावणीमुळे पावसाळा वगळता वर्षभरात सरासरी प्रतिदिन ९०० ते १२०० युनीट्सची निर्मिती या सौर प्रकल्पात होणार असून वार्षिक विद्युतभारावर होणा-या खर्चात अंदाजे रुपये २५ लक्ष एवढी बचत होणार आहे. या योजनेसोबतच लवकरच लासलगाव विंचूरसह सोळागाव पाणी पुरवठा योजना देखील सौर ऊर्जेवर कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष सचिन कळमकर तर आभार उपाध्यक्ष मोहन शेलार यांनी केले.
Exit mobile version