HW News Marathi
महाराष्ट्र

गुजरात जर विकासाच्या मार्गावर होतं, मग रातोरात मुख्यमंत्री का बदलला?

मुंबई। गुजरात हे जर विकास, आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली?, असा सवाल आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. कुठं काय बदलायचं हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. भाकरी ही फिरवावीच लागते, पण एखादे राज्य जेव्हा विकास किंवा प्रगतीचे ‘मॉडेल’ असल्याचे आदळआपट करीत सांगितले जाते, तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की, मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात, अशी टीका करत भाजपवर निशाणा साधला आहे.

जवळच्या लोकांना अवाक् केले

रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा पुढच्या दोन दिवसांत उपमुख्यमंत्री नितीन पटेल, गोवर्धन जदाफिया, मनसुख मांडवीय, सी. आर. पाटील अशी अनेक नावे चर्चेत आणून मीडियातील चर्वण पद्धतशीर सुरू ठेवले. आपणक मोदींच्या जवळ आहोत व मोदींच्या मनात काय चालले आहे हे फक्त आपल्यालाच कळते असे अनेक पत्रकारांना वाटत होते व ते मोदी ‘यालाच’ किंवा ‘त्यालाच’ मुख्यमंत्री करतील असे सांगत होते. भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदी नेमणूक करून मोदी यांनी या सर्व तथाकथित जवळच्या लोकांना अवाक् केले. ‘मीउ कोणाचा नाही, माझे कोणी नाही’ हाच संदेश मोदी यांनी दिला आहे.

खेळण्यांपासून ते पाळण्यांपर्यंत, पण त्यांच्या मनात काय चालले आहे याचा..

पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’विषयी नेहमीच उत्सुकता असते. ज्या विषयांची कोणालाही कल्पना नसते असे अनेक विषय धुंडाळून मोदी ‘मन की बात’ व्यक्त करीत असतात. अगदी खेळण्यांपासून ते पाळण्यांपर्यंत, पण त्यांच्या मनात काय चालले आहे याचा शोध घेणे कठीण आहे, हे गुजरातच्या मुख्यमंत्री निवडीवरून स्पष्ट दिसले. भूपेंद्र पटेल हे गुजरातचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांचे नाव समोर आले तेव्हा ‘कोण हे महाशय?’ असा प्रश्न बहुतेक सगळय़ांनाच पडला.

ही फक्त रंगसफेदीच आहे

गुजरातमध्ये बेरोजगारीचा भस्मासुर नाचतो आहे. अनेक मोठे उद्योग बंद पडले आहेत. अहमदाबादजवळच्या ‘फोर्ड’ गाड्या बनवणाऱ्या कंपनीने गाशा गुंडाळला व 40 हजार लोकांवर बेरोजगारीचे संकट कोसळले. संपूर्ण गुजरातमधील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुण आक्रोश करीत आहेत व निवडणुकांत या संतापाचा फटका बसेल ही खात्री असल्यानेच मुख्यमंत्री रुपाणी यांना बदलून भूपेंद्र पटेल यांना नेमले. ही फक्त रंगसफेदीच आहे. भूपेंद्र पटेल हे आनंदीबेन पटेल यांचे समर्थक आहेत. रूपाणी यांच्यामागे अमित शहा होते. त्यामुळे गुजरातमधील उद्याचे राजकारण जितके गोंधळाचे तितकेच रोचक असेल.

रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली?

भूपेंद्र पटेल यांची निवड आमदारांकडून एकमताने झाली, पण भूपेंद्र यांनाही आपण मुख्यमंत्री होतोय हे माहीत नव्हते. गेल्या चार वर्षांत त्यांना साधे मंत्रीही केले नव्हते. ते एकदम मुख्यमंत्रीच झाले. दिल्लीहून नाव आले व ते भाजपच्या विधिमंडळ पक्षाने मान्य केले. नेता निवडीसाठी आमदारांनी मतदान केले असते तर दुसऱ्याच एखाद्या नावावर पसंतीची मोहोर उठली असती. काँग्रेस पक्षातही हे असेच घडते व यालाच आपल्याकडे लोकशाही म्हणावे लागते. लोकशाहीचे, राज्यकारभाराचे व विकासाचे गुजरात मॉडेल अशा प्रकारे फुगा फुटावा तसे टपकन फुटले आहे. गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली?

भाकरी ही फिरवावीच लागते

याच पद्धतीने उत्तराखंड, कर्नाटकचे मुख्यमंत्रीही काही दिवसांपूर्वी बदलण्यात आले. मध्य प्रदेशातही बदल केले जातील असे संकेत आहेत. फक्त मुख्यमंत्रीच नाही, तर ज्या राज्यांत भाजपची सरकारे नाहीत, तेथेही नेतृत्वबदल होतील असे प्रसिद्ध झाले आहे. कोठे काय बदलायचे हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. भाकरी ही फिरवावीच लागते, पण एखादे राज्य जेव्हा विकास किंवा प्रगतीचे ‘मॉडेल’ असल्याचे आदळआपट करीत सांगितले जाते, तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की, मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात. भूपेंद्र पटेल यांच्यावर आता गुजरातचा भार पडला आहे. वर्षभरात विधानसभांच्या निवडणुका आहेत. पटेल यांना पुढे करून नरेंद्र मोदी यांनाच लढावे लागणार आहे. गुजरात मॉडेल म्हणायचे ते हेच काय?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत सेम टू शेम! 

News Desk

आघाडी सरकारला ५ लाख रुपयांची मदत करायला काय हरकत आहे – विखे पाटील

News Desk

आरोग्यमंत्र्यांनी खोलवर माहिती न घेता RTPCR किट्सवर वक्तव्य केले – अमित देशमुख 

News Desk