पुणे। खासदार अमोल कोल्हे सभा गाजविणारे वक्ते नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या मनातील भावना ते व्यक्त करत असतात. अनेकवेळा राजकीय फटकेबाजीच्या माध्यमातून ते विरोधकांवर तसंच स्वपक्षीयांनाही डोस पाजत असतात. भोसरीमध्ये बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागणं गरजेचं आहे. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालण्याची गरज त्यांना पडणार नाही, असं काम राष्ट्रवादीच्या नेते कार्यकर्त्यांनी करायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांना पिंपरी चिंचवड मध्ये लक्ष घाला अशी विनंती केली होती. त्यानुसार शरद पवार 13 ऑक्टोबरला माजी नगरसेवकांची बैठक घेणार आहेत तर 16 तारखेला मेळावा घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोल्हे यांनी स्थानिक नेत्यांना कानपिचक्या दिल्या. अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवायचे असेल तर इथल्या नेत्यांनी त्यांच्याकडून अपेक्षा न ठेवता इथे ताकत वाढवली पाहिजे, असंही ते म्हणाले.
पंतप्रधान या सर्वोच्च पदावर बसलेले पहायचे
आपणाला शरद पवार यांना पंतप्रधान या सर्वोच्च पदावर बसलेले पहायचे असेल तर त्यांना पिंपरी चिंचवड सारख्या शहरात लक्ष घालावायला लागू नये अशी माझी भावना असल्याचे मत शिरूर चे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. भोसरी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावला
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी पिंपरी-चिंचवड शहराची ओळख होती. पिंपरी-चिंचवड शहरावर वर्षानुवर्षे पवारांनी सत्ता गाजवली. मात्र, महापालिकेच्या मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावला अन् भाकरी फिरवली. आता भाजपच्या हातून ही सत्ता काबिज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार स्वत: रिंगणात उतरले आहेत. 13 ऑक्टोबर रोजी शरद पवार माजी नगरसेवकांची बैठक घेणार आहेत तर 16 ऑक्टोबरला पवारांच्या उपस्थित मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
निवडणूक प्रचाराचा नारळ पवार पिंपरी-चिंचवड मध्येच फोडायचे
आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका पिंपरी-चिंचवड महापालिकेचा नावलौकिक आहे. हे देशातील एक प्रमुख औद्योगिक शहर आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीमध्ये सगळ्यात मोठा वाटा हा शरद पवारांचा राहिला आहे. पूर्वी हा लोकसभेचा बारामती मतदार संघाचा भाग होता. आपल्या निवडणूक प्रचाराचा नारळ पवार पिंपरी-चिंचवड मध्येच फोडायचे. पण 2017 च्या निवडणूकीत पिंपरी-चिंचवडकरांनी आपला कारभारी बदलला. अर्थात राष्ट्रवादीतल्या काही फुटीर नेत्यांमुळेच भाजपला पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता मिळवणं शक्य झालं.
कारभार पार्थ पवारांच्या हातात गेल्यावर आपलं काय?
शरद पवारांची भेट घेणाऱ्यांमध्ये आझमभाई पानसरे, विलास लांडे, श्रीरंग शिंदे, शाम वाल्हेकर यांच्यासह विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांचाही समावेश होता. शहरात पक्ष संघटना मजबूत करण्यात या सर्वांच मोठं योगदान असलं तरी सध्या त्यांच्यात नाराजीही आहे. काहींची नाराजी अजित पवारांच्या कार्य पध्दतीवर आहे. तर काहींना शहराचा कारभार पार्थ पवारांच्या हातात गेल्यावर आपलं काय? याचीही चिंता सतावत असल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
पवार कोणता डाव टाकणार
मावळमधील पराभवानंतर आता पार्थ पवार यांच्याकडे पिंपरी-चिंचवड शहराची सूत्र जाण्याची चर्चा आहे. अशावेळी जुने नेते मात्र परत शरद पवारांकडे गेले आहेत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटातटाच राजकारण समोर आलंय. दुसरीकडे महापालिका निवडणुकीसाठी 3 सदस्यीय प्रभाग झाल्यावर राष्ट्रवादीमधील अनेकांची झोप उडाली आहे. त्यामुळं पिंपरी चिंचवड मध्ये पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी अन गटातटाचं राजकारण मोडून काढण्यासाठी 16 ऑक्टोबर रोजी पवार कोणता डाव टाकणार याकडे सत्ताधारी भाजपसह सर्वांचे लक्ष लागले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.