Site icon HW News Marathi

बीड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान; एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

बीड | बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. त्यामुळे बीड जिल्ह्यात (Beed) शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरूच आहे. अतिवृष्टीने उभे पिक उध्वस्त झाल्याने, शेतकरी हा हतबल होऊन आत्महत्याकडे वळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात शनिवारी (29 ऑक्टोबर) एकाच दिवशी गेवराई तालुक्यात 2 शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या करत आपले जीवन संपवलय.

अमोल रानमारे आणि अर्जुन धोत्रे असे आत्महत्या करुन जिवन संपविलेल्या दोन शेतकऱ्यांची नावे आहेत. तर या दोन्ही शेतकऱ्यांनी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले, यामुळे आत्महत्या केल्याचे समोर आलेय. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ऐन दिवाळीत शेतकरी संकटात आहेत. मात्र, शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू, असे अनेक मंत्र्यांनी सांगितले. परंतु, दिवाळीच्या सणाला शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसानीची दमडीही मिळाली नाही. यामुळे जगावे कसे ? या विवंचनेत असलेला शेतकरी आता आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यात निसर्ग संकटाने शेतकरी भरडला जात आहे. मात्र, सरकार आणि सरकारमधील मंत्री हे केवळ राजकारणात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी पुरता हातबल झाला असून आत्महत्या सारखे टोकाचे पावले उचलत आहे. यामुळे सरकारने या शेतकऱ्यांना धीर आणि आधार देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Exit mobile version