HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेस राजवटीत आंदोलन करणाऱ्यांनो कोणत्या बिळात लपलात? वाढत्या इंधन दरांवरुन भाजपवर सेनेची टीका

मुंबई। पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सामान्य लोकांच्या खिशावर पडलेला ताण हा गेल्या काही दिवसांमधला चर्चेचा विषय बनला आहे. शिवसेनेनेही ‘सामना’ अग्रलेखातून आज भाजपवर टीका केली आहे.केंद्र सरकारला लागलेली अवाढव्य करांची चटक आणि तिजोरी भरण्याच्या हव्यासातच पेट्रोल-डिझेल दरवाढीचे मूळ दडले आहे. आता तर विमानाच्या इंधनापेक्षाही दुचाकींचे इंधन महाग झाले. मनमोहन सिंग सरकारच्या काळात गल्लीपासून दिल्लीपर्यंत पेट्रोल दरवाढीविरुद्ध रणकंदन करणारी भारतीय जनता पक्षाची नेतेमंडळी आता मात्र मूग गिळून गप्प आहेत. ते आंदोलन करणारी मंडळी गेलीत कुठे? असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे.

विमानाच्या इंधनापेक्षाही दुचाकीचे इंधन महाग

इंधनाची ही ‘हवा-हवाई’ दरवाढ सामान्य जनतेची कंबर मोडणारी आहे. ‘बहोत हो गयी महंगाई की मार…’ अशी घोषणा देऊन सत्तेवर आलेल्या सरकारने केलेला हा चमत्कार आहे. आपणच ओढवून घेतलेला हा ‘मार’ मुकाट्याने सहन करण्याशिवाय जनतेच्या हाती तरी दुसरे काय उरले आहे?, असा संतापही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अग्रलेखातून व्यक्त केला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर अवाक्याबाहेर गेल्यामुळे आजच्या अग्रलेखातून केंद्र सरकारच्या धोरणांवर शिवसेनेने चांगलीच टीका केली आहे. गेल्या तीन आठवड्यांमध्ये तर तब्बल 16 वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. लागोपाठ होणाऱया या दरवाढींमुळे देशभरातील जनमानस अस्वस्थ आहे. मागच्या आठवडय़ात रविवारपर्यंत तर सलग चार दिवस पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढ केली आणि इंधनाच्या दरांनी भलताच उच्चांक गाठला. विमानाच्या इंधनापेक्षाही दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे इंधन महाग झाले, या परिस्थितीतीच आठवण शिवसेनेने करुन दिली आहे.

आंदोलन करणाऱ्यांनो कोणत्या बिळात लपलात?

यावेळी अग्रलेखातून शिवसेनेने भाजपवर थेट निशाणा साधला आहे. ‘पेट्रोल-डिझेल सस्ता चाहिए की नहीं चाहिए?’ असे सवाल निवडणुकींच्या प्रचार सभांतून उपस्थित करत भाजपने दिल्लीची सत्ता मिळवली, तेव्हा देशात पेट्रोल 72 रुपये तर डिझेल 54 रुपये प्रतिलिटर या दराने विकले जात होते. आज पेट्रोल-डिझेल शंभरी ओलांडून पुढे गेले, विमानाच्या इंधनापेक्षाही महाग झाले. देशभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे, पण तेव्हाचे तमाम आंदोलनकर्ते आता कुठल्या बिळात लपून बसले आहेत हे कळण्यास मार्ग नाही.

तोंड शिवली आहेत का?

काँग्रेसच्या राजवटीत पेट्रोल-डिझेलच्या दरांनी साठी ओलांडल्यानंतर देशभर आंदोलनांचे काहूर माजवून बेंबीच्या देठापासून कोकलणारी मंडळी आज सत्तेत आहेत, पण त्यांची तोंडे आता शिवलेली आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत पेट्रोल दरवाढीविरुद्ध रणकंदन करणारी भारतीय जनता पक्षाची नेतेमंडळी आता मात्र मूग गिळून गप्प आहेत. पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरुद्ध कोणी एक शब्दही बोलायला तयार नाही असं म्हणत शिवसेनेने भाजपला चिमटा काढला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“४ महिन्यात ठाकरे सरकारचे ६ मंत्री सीबीआयच्या दारात असतील”, किरीट सोमय्या यांचा दावा!

News Desk

पश्चिम महाराष्ट्राच्या मदतीसाठी रामराजे नाईक-निंबाळकर सरसावले!

News Desk

रेखा जरे हत्या प्रकरण : मुख्य सूत्रधार बाळ बोठेला पोलिसांनी हैदराबादमध्ये ठोकल्या बेड्या

News Desk