Site icon HW News Marathi

‘यहा के हम सिकंदर’; खेलो इंडियामध्ये कोल्हापूरच्या पूजाच्या नावे 6 पदक

मुंबई | कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट पूजा दानोळेने (Pooja Danole) आपले वर्चस्व आबाधित ठेवत पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्समध्ये (Khelo India Youth Games) पदकाचा षटकार नोंदवला. पूजा दानोळेने आज (9 फेब्रुवारी) जबलपूर येथे आयोजित रोडच्या ६० किमी अंतराच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी धडक मारली. पूजाने ही रेस २ तास १३ मिनिट ४८.९४१ सेकंदात हे अंतर पूर्ण केले. त्यामुळे तिला या इव्हेंटमध्ये रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले. तिने गोल्डन हॅट्रिकसह दोन रौप्य व एक कांस्यपदकाची कमाई केली. पूजाच्या सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र संघाला सायकल रोड रेसमध्ये चॅम्पियनशिप देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र महिला संघाने रोड रेस सायकलिंग स्पर्धेचा समारोप रौप्य पदक जिंकून साजरा केला. या स्पर्धेत महाराष्ट्राला एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांचा बहुमान मिळवता आला.

महाराष्ट्र संघाचे डझनभर पदके

आंतरराष्ट्रीय पूजाच्या नेतृत्वात महाराष्ट्र सायकलींग संघाने यंदाच्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये डझनभर पदकांची कमाई केली. यामध्ये एकट्या पूजाने अर्ध्या डझन पदकांचे योगदान दिले. महाराष्ट्र संघाने सायकलिंग स्पर्धेत ४ सुवर्ण, ६ रौप्य आणि २ कांस्य पदकाची कमाई केली आहे.

मेहनतीमुळे मिळाला मोठा बहुमान: प्रशिक्षक दिपाली पाटील

राष्ट्रीय स्तरावरील खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये सोनेरी यश संपादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंनी प्रचंड मेहनत केली. जिद्द आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर खेळाडूंनी पदकांचा पल्ला गाठला. त्यामुळे निश्चितपणे त्यांची ही कामगिरी कौतुकास्पद ठरत आहे. चॅम्पियनशिप चा बहुमान मिळवून या खेळाडूने महाराष्ट्राच्या नावलौकिकास साजेशी कामगिरी केली आहे, अशा शब्दात मुख्य प्रशिक्षक दिपाली निकम यांनी खेळाडूंचे खास कौतुक केले.

 

महाराष्ट्राचे घवघवीत यश: चंद्रकांत कांबळे

दिल्ली मधील आंतरराष्ट्रीय सायकलिंग ट्रॅक आणि मध्य प्रदेशातील रोड रेस गाजवत महाराष्ट्राच्या युवा सायकलिस्टने यंदाच्या खेलो इंडिया युथ गेम मध्ये घवघवीत सोनेरी यश संपादन केले. डझनभर पदके जिंकून महाराष्ट्र संघ चॅम्पियनशिप चा मानकरी ठरला, ही राज्यासाठी गौरवशाली बाब ठरली आहे. यादरम्यान संघातील प्रत्येक खेळाडूने प्रचंड मेहनतीच्या बळावर महाराष्ट्राला हा मोठा बहुमान मिळवून दिला. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने कौतुकाचे मानकरी आहेत, अशा शब्दात महाराष्ट्र संघाचे मुख्य पथक प्रमुख सहसंचालक चंद्रकांत कांबळे यांनी संघावर कौतुकाचा वर्ष केला.

 

चॅम्पियनशिपने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा: दिवसे

मेहनत आणि प्रचंड जिद्द यातून महाराष्ट्राच्या युवा सायकलिस्टने यंदा सर्वोत्तम कामगिरी केली. सायकलिंग मधील सर्वसाधारण विजेतेपद मिळवून या खेळाडूंनी महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे हे सर्व पदक विजेते खेळाडू निश्चितपणे कौतुकास पात्र ठरत आहेत. याच दर्जेदार कामगिरीमुळे जागतिक स्तरावर हे खेळाडू निश्चितपणे महाराष्ट्राला मोठी ओळख मिळवून देतील, असा विश्वास क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी व्यक्त केला. यादरम्यान त्यांनी महाराष्ट्र सायकलिंग संघाचे खास कौतुकही केले.

Exit mobile version