HW News Marathi
देश / विदेश

इस्त्रोची मोहीम फेल, क्रायोजेनिक इंजनमध्ये बिघाड झाल्याने मिशन रद्द!

नवी दिल्ली। इस्त्रोची मोहीम अपयशी ठरली, क्रायोजेनिक इंजनमध्ये बिघाड झाल्याने हा प्रकार घडला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोची उपग्रह प्रक्षेपण मोहीम अयशस्वी ठरली आहे. आज(१३ ऑगस्ट) पहाटे जीएसएलव्ही- एफ १० या रॉकेटने नियोजित वेळेनुसार ५ वाजून ४३ मिनिटांनी श्रीहरिकोटा इथून ईओएस-०३ या कृत्रिम उपग्रहासह अवकाशात झेप घेतली. प्रक्षेपकाचे पहिले दोन टप्पे यशस्वी पार पडले. मोहीम सुरू झाल्यावर साधारण नऊ मिनिटात प्रक्षेपकाने सुमारे १३० किलोमीटर एवढी उंची गाठल्यावर मोहिमेतील महत्त्वाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. उपग्रहाला आणखी उंचीवर नेणारा क्रायजेनिक इंजिनाचा टप्पा सुरू झाला. पण अवघ्या काही सेकंदातच या इंजिनासह उपग्रह नियोजित मार्ग भरकटत असल्याचे लक्षात आले.

इस्रोच्या पदरी निराशा

या सर्व उपग्रह मोहिमेचे थेट प्रक्षेपण इस्रोच्या संकेतस्थळावरून आणि इस्रोच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू होते. श्रीहरिकोटा इथल्या मिशन कंट्रोलमधून प्रत्येक सेकंदाबाबत होणाऱ्या घडामोडीची माहिती सांगितली जात होती. मात्र मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात गडबड झाल्याचे लक्षात आल्यावर मिशन कंट्रोलमधील सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अभियंते यांचे चेहरे चिंतातुर झाले. त्यानंतर दहा मिनिटात या मोहिमेचा आढावा घेत इस्रोचे अध्यक्ष डॉ के सिवन यांनी मोहीम पूर्ण झाली नसल्याचे स्पष्ट केले.

आजच्या मोहिमेत क्रायजेनिक इंजिनाच्या टप्प्यावर, तिसऱ्या टप्प्यावर तांत्रिक बिघाड झाल्याचे प्राथमिकरित्या दिसून येत आहे. हा इस्रोसाठी मोठा धक्का आहे. कारण अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात क्रायजेनिक इंजिन हे अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. अमेरीका, रशिया, फ्रान्स, जपान, चीन या देशानंतर फक्त भारताकडे हे तंत्रज्ञान आहे. क्रायजेनिक इंजिनाच्या तंत्रज्ञावर प्रभुत्व मिळवल्याने इस्रोने जास्त वजनाच्या उपग्रह प्रक्षेपणाच्या मोहिमा आखायला सुरुवात केली होती.

याआधी हीच मोहीम तांत्रिक कारणांनी दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. आता तिसऱ्या प्रयत्नात मोहीम अयशस्वी झाली आहे. तेव्हा आजच्या अपयशाचा आगामी मोहिमांवर विशेषतः भारतीय अंतराळवीर स्वबळावर अवकाशात नेणाऱ्या ‘गगनयान’ मोहिमेवर परिणाम होतो का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या उपग्रहामुळे भारतीय उपखंडातील विविध भागाची २४ तास सुस्पष्ट छायाचित्रे घेणे शक्य होणार आहे. पीक लागवडीच्या क्षेत्राबद्दल माहिती घेणे, दुष्काळ-पूर परिस्थीतीवर लक्ष ठेवणे, सागरी क्षेत्र व्यवस्थापन, वातावरणातील धुकं-धुळ याबद्दलची ताजी माहिती, आपातकालीन व्यवस्थापन अशा विविध गोष्टींसाठी या उपग्रहाचा उपयोग होणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रावर अन्यायाची केंद्र सरकारची परंपरा यंदाच्या अर्थसंकल्पातही कायम! – अजित पवार

Aprna

धक्कादायक ! सुरक्षा दलाच्या धान्यसाठ्यात विष कालवून घातपात करण्याचा पाकिस्तानचा कट ?

News Desk

लष्करातील महिलांना स्थायी कमिशन लागू 

swarit