HW News Marathi
महाराष्ट्र

‘प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही’; भाजपकडून मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (१४ जानेवारी) मुंबई महापालिकेच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट बॉट’ या सुविधेचे लोकार्पण केले. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली होती. विरोधी पक्ष विचारत असलेल्या प्रश्नांवर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की ‘प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही.’ तर मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरून विरोधी पक्षांनीही पलटवार केला आहे. प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही. पण, विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायला अक्कल नक्कीच लागते, असं ट्वीट करत भाजपने बोचरी टीका केली आहे. तर भाजपा नेते व आमदार आशिष शेलार यांनीही मुख्यमंत्र्याच्या या विधानाला प्रत्युत्तर दिलं आहे.

“काम न करताही बोलणारे लोक आहेत. तर काही लोक काम करून पण बोलत नाहीत. परंतु, आमचा कारभार उघड आहे, आम्ही काही लपवत नाही, महापालिका नेमकी काय आणि कसं काम करते हे समोर आलं पाहिजे. कोरोना काळात मुंबई महापालिकेने प्रचंड काम केलं. त्याचं कुणी घरच्यांनी आपलं कौतुक केलं नाही. तर थेट न्यू यॉर्कने आणि सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केलं. मात्र, आपण कौतुक करण्यासाठी काम करत नाही, तर कर्तव्य म्हणून काम करत असतो. शेवटी आपलं काम बोलतं. शंका घेणारे अनेक आहेत, पण प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा समाचार घेतला.

दरम्यान, यावरून आशिष शेलारांनी ट्विटरद्वारे मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. गारगाई धरणाच्या खर्चाच्या कितीतरी पट जास्त खर्च करुन समुद्राचे पाणी गोडे करण्याचा हट्टाहास का? गेल्या २४ वर्षात २१ हजार कोटी खर्च करुनही मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे का? ११४% नालेसफाई करुनही मुंबईत पाणी का तुंबते? मुंबई पालिका वर्षाला साडेचार हजार कोटी आणि पाच वर्षात २२ हजार ५०० कोटी खर्च करुनही पालिकेच्या रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडून रुग्ण मरतोच कसा? वरळीच्या सिलेंडर स्फोटातील रुग्णांचा मृत्यू का झाले? मृतदेहा शेजारीच कोरोना रुग्णांना उपचार का दिले?, असे एका पाठोपाठ एक सवाल शेलारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत.

तसेच ते पुढे म्हणाले की, परीक्षा रद्द करणारेच विद्यापीठात पदवीदान समारंभाला पाहुणे कसे? ज्यांनी प्रकल्पांना विरोध केला तेच आज प्रकल्पांचे श्रेय घ्यायला आणि नावं द्यायला पुढे पुढे कसे? मुंबईत गेल्या ११ वर्षात ४० हजार झाडांची बिल्डरांसाठी कत्तल केली, मग मुंबईकरांची मेट्रो कारशेडच का अडवून ठेवली? कोस्टलरोडच्या कामात १६०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा तवंग कसा? मुंबईतील आरक्षणे बदलून भूखंडांचे श्रीखंड कुणी खाल्ले? मुंबईतील गिरणी कामगार कुठे गेले? असे बरेच प्रश्न मुंबईकरांना रोज पडतात, आम्ही ते विचारत राहू! कारण… प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही?, असा टोमणाही अखेरीस शेलारांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

६ जूनला शिवराज्याभिषेकापर्यंत भूमिका घ्या नाहीतर…रायगडावरून आंदोलन जाहीर होणार !

News Desk

नाशिक मनपा निवडणूक अमित ठाकरेंच्या नेतृत्वात लढणार!

News Desk

उद्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वे २ तास बंद

News Desk