Site icon HW News Marathi

सिंगापूरमधील आरोग्य परिषदेत सहभागी होणार! – राजेश टोपे

मुंबई । सिंगापूरमधील ‘वर्ल्ड वन हेल्थ काँग्रेस’ मध्ये महाराष्ट्र सहभागी होईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल (१७ जून) येथे दिली.

सिंगापूरमध्ये नोव्हेंबर महिन्यात महामारी विरुद्ध काय उपाययोजना करण्यात याव्यात यावर विचार मंथन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत सुमारे दीड हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

याबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री  टोपे यांनी काल सिंगापूरच्या शिष्टमंडळाशी सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे चर्चा केली. यावेळी सिंगापूरचे कौन्सिल जनरल मिंग फूंग चेऑंग, सिंग हेल्थचे शेरॉन टॅन होत यांग, डॉ. विजया राव, डॉ. संतोष भोसले, ऑस्रा हेल्थच्या डॉ. रसिका तासकर आदी उपस्थित होते.

बैठकीत सिंगापूरच्या सिंगहेल्थच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत माहिती देण्यात आली. यावर मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, सिंग हेल्थच्या वतीने नुकतेच राज्यातील बारामती, जालना, नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दवाखान्यात प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे तेथील आरोग्य यंत्रणा विकसित होण्यासाठी उपयोग झाला आहे. भविष्यातही आरोग्य विभागाच्या विविध दवाखान्यात सिंगहेल्थच्या वतीने प्रशिक्षण राबविण्यात येईल.

यावेळी जालना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी टेमासेक फाउंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या प्रशिक्षणामुळे आरोग्य व्यवस्थेत झालेल्या बदलाबाबत माहिती दिली.

Exit mobile version