Site icon HW News Marathi

मदर्स युनायटेड मूमेंट : धीरोदात्त मातांच्या वाटचालीचा गौरव करणाऱ्या जागतिक चळवळीला पंतप्रधानांचा पाठिंबा

मुंबई | लहान बाळांची फोटोग्राफी करणाऱ्या आणि भारतातील पहिल्या पोर्ट्रेट फोटोग्राफर शिखा खन्ना (Shikha Khanna) यांच्या संकल्पनेतून साकारलेले मदर्स युनायटेड मूमेंट (Mothers United Moment-MUM) हे महिलांसाठीचे एक अभिनव व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांनी जगभरातील १०० धाडसी, धैर्यवान मातांची प्रेरणादायी कहाणी जगापुढे आणली आहे. “१०० सेल्फ-पोर्ट्रेट्स १०० ड्रीम्स” या कॉफी टेबल बुक द्वारे त्यांनी या धाडसी मातांचा विलक्षण प्रवास मांडला असून नव्या पिढीला प्रोत्साहन देणारी मातृत्वाची भावना जागृत करणे हा या कार्यक्रमामागचा उद्देश आहे.

या पुस्तकात शिखा खन्ना यांनी हवाई दल, एलजीबीटीक्यू समुदाय, जीवनशैली प्रशिक्षक, डॉक्टर, वैज्ञानिक, संगीतकार, छायाचित्रकार अशा नानाविध क्षेत्रातील धाडसी मातांचा प्रवास टिपला आहे. ऑलिंपिकपटू आणि अर्जुन पुरस्कार विजेती अश्विनी नाचप्पा, अभिनेत्री, व्हीजे, होम शेफ मारिया गोरेटी, दृष्टिहीन कलाकार शेल्यान सिद्दो, पॅरा-अॅथलीट, पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कारप्राप्त दीपा मलिक अशा अनेक मातांचा यात समावेश आहे.

त्यांच्या या अभिनव उपक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष पत्र पाठवून आपला पाठिंबा दर्शविला आहे. “तुम्ही ‘१०० सेल्फ-पोर्ट्रेट १०० ड्रीम’ हे पुस्तक आणत आहात हे जाणून मला आनंद झाला. एक अब्जाहून अधिक स्वप्नांच्या देशात महिलांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरीत करण्यासह त्यांना सक्षम बनवण्याच्या या प्रयत्नांना यश मिळावे अशी माझी सदिच्छा आहे. पुढील २५ वर्षांमध्ये, देशाच्या अमृतकाळात महिला एक सशक्त आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. तुमच्या प्रयत्नांमुळे महिलांच्या नेतृत्वाखालील देशाच्या विकासाच्या अभियानाला आणखी बळ मिळेल, याची मला खात्री आहे.”

या उपक्रमाविषयी बोलताना मदर्स युनायटेड मोमेंटच्या क्युरेटर शिखा खन्ना म्हणाल्या, “मदर्स युनायटेड मोमेंट (MUM)हा मातांचा माता म्हणून सन्मान करण्याचा एक उपक्रम आहे. यामध्ये त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाची समतोल वाटचाल छायाचित्रांच्या माध्यमातून एक कथा गुंफून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आई म्हणून मला नेहमी वाटायचे, की आईचा आवाज कितीही सशक्त असला तरी अनेकदा तो ऐकला जात नाही. मला त्यांना त्यांच्या नजरेतून (लेन्सद्वारे) व्यक्त होण्यासाठी आणि त्यांची सुंदर कथा त्यांच्याच शब्दात सांगण्याचे माध्यम द्यायचे होते. आयुष्यातील संघर्षाला घाबरणाऱ्या, एकट्या पडलेल्या इतर मातांना प्रोत्साहन द्यायचे होते.”

“हे पुस्तक इतरांपेक्षा वेगळे ठरते कारण यात या माता स्वतःला छायाचित्रांतून व्यक्त करत आहेत. त्यांच्या मातृत्वाचा, त्यांच्या यशस्वी आयुष्याचा पट मांडत आहेत.”

 

अशा या मातांचा सन्मान करण्यासाठी ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट येथे तीन दिवसीय कार्यक्रमात जगभरातील १०० हून अधिक मातांना एकत्र आणण्यात येत आहे. प्रत्येक सत्र वेगळे असणार आहे, त्यामुळे कोणत्या सत्राला उपस्थित राहायचे आणि कोणते वगळायचे हे ठरवणे उपस्थितांना खूप कठीण जाणार आहे.

या तीन दिवसीय कार्यक्रमात रन फॉर एमयूएम मॅरेथॉन, पुणे टूर, फिल्म स्क्रिनिंग, सुफी म्युझिक नाईट आणि स्टँड-अप अॅक्ट्स यांसारखे अनेक मनोरंजन कार्यक्रम असतील. यातून निधी जमा केला जाईल आणि तो सुंदरजी इन्स्टिट्यूट ऑफ स्पेशल स्कूलमध्ये सेन्सरी रूम बांधण्यासाठी देण्यात येईल. ज्या मुलांच्या शैक्षणिक गरजा मुख्य प्रवाहात पूर्ण होऊ शकत नाहीत, अशा विशेष मुलांसाठी योग्य शैक्षणिक वातावरण निर्माण करते.

 

Exit mobile version