HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

“राज्यातील शेतकऱ्यांकडे लक्ष द्या”, खासदार रक्षा खडसेंचं मुख्यमंत्र्यांऐवजी शरद पवारांना पत्र

मुंबई | कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लादले आहेत. इतकंच नाही तर अनेक जिल्ह्यांत लावलेल्या लॉकडाऊन व जिल्हाबंदीमुळे शेतकऱ्यांसह छोट्या मोठ्या उद्योगांवर मोठा परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून भाजप खासदार रक्षा खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे. दरम्यान, रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी शरद पवारांना पत्र लिहिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

रक्षा खडसे यांनी काय लिहिलं आहे पत्रात?

शेतमालाला भाव नाही, केंद्र सरकारचे पॅकेज वगळता राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत नाही, जिल्हाबंदीमुळे वाहतूक बंद आहे, बाजार समित्या बंद असून हाताशी पैसा नसल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे. अवकाळी पाऊस आणि वादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेती उत्पादनाचे प्रचंड नुकसान होत असून उभी पिके नष्ट करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

शेतात ओतलेला पैसा मातीत गेला असून शेतकरी कधी नव्हे एवढा निराशेच्या गर्तेत सापडला आहे. बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद झाल्याने नाशवंत शेतमालाची विल्हेवाट लावणेदेखील शेतकऱ्यास परवडेनासे झाले आहे. तरी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्यासाठी सरकारकडून काही काळाची सवलत मिळावी यासाठी शरद पवार यांनी आपल्या स्तरावरून पाठपुरावा करावा , असेही त्या म्हणाल्या आहेत.

केंद्राने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले, राज्यानेही पुढाकार घ्यावा – रक्षा खडसे

बार आणि हॉटेल व्यावसायिकांप्रमाणेच शेतकरीदेखील विजेच्या संकटात असून, वीजबिल माफी योजनेचा घोळ अजून संपलेला नाही. शेतकऱ्यांच्या थकित वीजबिलात ३३ टक्के सवलत देण्याची राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केलेली घोषणा अजूनही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलेली नाही. दुष्काळी मदत आणि पिकविम्याच्या योजना शेतकऱ्यांपासून लांबच आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे कोणतेही नियोजन राज्य सरकारने याकाळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केलेले नाही.

लॉकडाऊनमुळे जेव्हा इतर सर्व उद्योगधंदे बंद होते, तेव्हा शेतकरी मात्र शेतात राबून पिके घेत होता. टाळेबंदीच्या काळातही शेती व शेतीपूरक उद्योगच ग्रामीण कुटुंबांसाठी आधार असल्याने राज्य सरकारने अन्य उद्योगंधंद्यांप्रमाणे शेतकऱ्यांसाठीही पॅकेज जाहीर करावे, राज्यातील ९४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकार प्रमाणे तातडीने सहा हजार रुपये जमा करावेत शेतमजूर, बारा बलुतेदार, वाजंत्रीवाले आणि हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यास मदत करण्यासाठीही शरद पवार यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

सरसकट कर्ज माफीची योजनाही वाऱ्यावर

दूध, द्राक्षे, कांदा, भाजीपाला, केळी, आंबे, फळे, फुले आदी शेतमालाच्या बाजारपेठा टाळेबंदीमुळे बंद झाल्याने दररोजच्या उत्पन्नास शेतकरी मुकला आहे. महाविकास आघाडी सरकारने केलेली सरसकट कर्जमुक्तीची घोषणाही सध्या वाऱ्यावर आहे.

बार आणि हॉटेल चाकांना मदत मग बारा बलुतेदारांनाही मदत करा

शरद पवार यांनी महाराष्ट्रातील बार आणि हॉटेल मालकांची तत्काळ दखल घेतली, त्याचप्रमाणे सामान्य शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, वाजंत्रीवाले आणि हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्याच्या कुटुंबांचा आक्रोशही महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते या नात्याने त्यांनी मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहचवून या कठीण काळात थोडाफार का होईना परंतु दिलासा द्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे.

Related posts

परदेश शिष्यवृत्तीसाठी आता ६ लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा

News Desk

जयंत पाटील अलर्ट… संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेत प्रशासनाशी घेतली बैठक!

News Desk

बुलढाणा जिल्ह्यात ७-२१ जुलै लॉकडाऊन जारी

News Desk