HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

सह्याद्रीतील नव्या वनस्पतीला दिले शरद पवारांचे नाव!

मुंबई | कोल्हापुरातील दोन युवा प्राध्यापक वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. विनोद शिंपले आणि डॉ. प्रमोद लावंड यांनी सह्याद्री पर्वतरांगेत नव्या वनस्पतीचा शोध लावला. या वनस्पतीला माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राजकारणातील सह्याद्री अशी ओळख असलेल्या शरद पवार यांचे नाव समर्पित करण्यात आले आहे. ही वनस्पती ‘अजेंरिया शरदचंद्रजी’ या नावाने ओळखली जाणार आहे. कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल वनस्पतींना पवारांचे नामकरण केल्याचं त्यांनी सांगितले आहे.

कोल्हापूरातील डाॅ.विनोद शिंपले आणि डाॅ.प्रमोद लावंड या दोन संशोधकांनी सह्याद्री पर्वत रांगेत एका नव्या वनस्पतीचा शोध लावला आहे. या नव्या वनस्पतीचं ‘अर्जेरिया शरदचंद्रजी’ असं नामकरण करण्यात आलं आहे. पवार यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल हे नाव दिलं असल्याचं या संशोधकांनी म्हटलं आहे. गारवेल कुळातील ही वनस्पती असून, डाॅ. विनोद शिंपले गेल्या वीस वर्षांपासून या कुळातील वनस्पतींवर संशोधन करत आहेत. त्यांनी गारवेल कुळातील आतापर्यंत ५ नव्या वनस्पतींचा शोध लावला आहे.

सुप्रिया सुळेंनी मानले आभार

“सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आढळणाऱ्या एका वनस्पतीचा शोध डॉ. विनोद शिंपले आणि डॉ प्रमोद लावंड यांनी लावला असून त्याला आदरणीय शरद पवार साहेबांचे नाव दिले आहे. आता ही वनस्पती ‘अजेंरिया शरदचंद्रजी’ या नावाने ओळखली जाईल. या दोन्ही संशोधकांचे मी मनापासून आभार मानते. महाराष्ट्र हे आपले कुटुंब आहे असं आदरणीय साहेब मानतात. असा आदर आणि सन्मान केवळ कुटुंबातच होऊ शकतो. या दोन्ही संशोधकांनी नव्या वनस्पतीचे संशोधन साहेबांच्या नावे समर्पित केले. याचा मला नितांत आदर आहे. धन्यवाद” असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

जगभरातील शास्त्रज्ञांकडून नाव मान्य

सह्याद्री पर्वतरांगेतील आलमप्रभू देवराईत या वनस्पतींचा शोध लागला. ही वनस्पती २०१६मध्ये सर्वप्रथम सापडली. तीन वर्षांच्या संशोधनानंतर जगाच्या कोणत्याही भागात असे साधर्म्य आणि वैशिष्ट्य असलेली वनस्पती अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संशोधकांना आपल्या नाविन्यपूर्ण शोधाला नाव देण्याचा अधिकार मिळतो. जगभरातील वनस्पती शास्त्रज्ञ या संशोधनाचा अभ्यास करुन संशोधकाने सुचवलेल्या नावावर शिक्कामोर्तब करतात.

काय आहे ही वनस्पती?

डॉ. विनोद शिंपले आणि डॉ प्रमोद लावंड यांनी शोध लावलेल्या वनस्पतीला जुलै ते सप्टेंबर महिन्यात फुले येतात. तर ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात फळं येतात. ही वनस्पती वेलवर्गीय आहे. तिला पिवळ्या रंगाची मोठी फळं येतात. या पोटजातीच्या वनस्पती मुख्यत्वे आशिया खंडातच आढळतात. आलमप्रभू देवराईत केवळ शंभर वेल असल्याने त्याचे जतन करणे आवश्यक आहे.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी घरातून बाहेर पडण्याचा सल्ला देणाऱ्या मनसैनिकाला दादा भूसेंचे प्रत्युत्तर

News Desk

“भाजपाच्या शिष्टमंडळाचा दिल्ली दौरा राज्याच्या विकासकामांसाठी उपयुक्त”, – चंद्रकांत पाटील

News Desk

उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधींना घेतलं ताब्यात; काँग्रेसमध्ये संतापाचं वातावरण

News Desk