HW News Marathi
महाराष्ट्र

‘जी – २०’ निमित्ताने पुण्यासह राज्य, देशाला क्षमता दाखविण्याची संधी! – चंद्रकांत पाटील

पुणे । ‘जी-२०’ (G-20) परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी आपल्याला मिळाली असून सर्व प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम समन्वय राखत ‘जी -२०’ परिषदेचे आयोजन यशस्वी करावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांनी दिले.

‘जी -२०’ परिषदेच्या तयारीबाबत पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल जे. डब्ल्‌यू मेरियट येथे आढावा बैठक पार पडली. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त मनपा आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे आदी उपस्थित होते.

‘जी -२०’ परिषदेच्या निमित्ताने प्रतिनिधींच्या स्वागतासाठी तसेच शहर सौंदर्यीकरण आणि अनुषंगिक विकासकामांची तयारी अपेक्षेपेक्षा खूपच चांगली झाली आहे, अशा शब्दात पालकमंत्री पाटील यांनी प्रशासनाचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले की, ३७ देशातील १५० हून अधिक प्रतिनिधी या परिषदेसाठी येणार असल्याने सुरक्षाविषयक तसेच शिष्टाचारासंबंधी सर्व काळजी घ्यावी. पुणे, महाराष्ट्राची औद्योगिक क्षमता, गुंतवणुकीची क्षमता संपूर्ण क्षमतेने प्रदर्शित करावी, पुणे शहराची संस्कृती, येथील विकास दाखवण्याची चांगली संधी पुणे शहराला मिळाली असून शहरातील नागरिकांनी आंतरराष्ट्रीय पाहुण्यांच्या स्वागतामध्ये सहभागी व्हावे, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.

यावेळी विभागीय आयुक्त राव यांनी नियोजित कार्यक्रमांचे संगणकीय सादरीकरण केले.  बैठकीसाठी भारत सरकारच्या निर्देशानुसार व समन्वयातून आवश्यक बाबींचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे महापालिकेच्यावतीने शहर सुशोभिकरणाचे काम कल्पकपणे करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सुरक्षाव्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

पाहुण्यांचे स्वागत, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, बैठकीनिमित्त देण्यात येणारी प्रतिकात्मक भेटवस्तू, स्मृतीचिन्हे, लावण्यात येणारे प्रदर्शन स्टॉल, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरुपाची भोजनव्यवस्था, आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या निमित्ताने भरडधान्याचे वैशिष्टपूर्ण खाद्यपदार्थ आदींबाबत यावेळी माहिती देण्यात आली.

‘जी -२०’ बैठक स्थळाशेजारी ५ प्रदर्शन दालने उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये पुणे महापालिकेकडून शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भात सुरु असलेल्या कामांची माहिती असणारे दालन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र आद्योगिक विकास महामंडळाचे महाराष्ट्र व पुण्याची औद्योगिक क्षमता प्रदर्शित करणारे दालन, भारतीय जनजातीय सहकारी विपनन विकास महासंघ (ट्रायफेड) आणि महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योगची उत्पादनांचा समावेश असलेले दालन तसेच महिला व बचत गटाची उत्पादने आणि सामाजिक वनीकरणांतर्गत बांबूपासून बनवलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री दालन उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पुणे विद्यापीठात १६ जानेवारी रोजी या पाहुण्यांच्या सन्मानार्थ शाही मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुणेरी ढोल पथक, महाराष्ट्राचे मर्दानी खेळ, लावणी जुगलबंदी, शिववंदना, गणेशस्तुती तसेच गोंधळ आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.

‘जी -२०’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर सौंदर्यीकरण कामांची पालकमंत्री यांच्याकडून पाहणी

‘जी -२०’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात करण्यात आलेल्या विविध शहर सौंदर्यीकरण कामांची तसेच विकास कामांची पाहणी पालकमंत्री  पाटील यांनी केली. विभागीय आयुक्त राव, मनपा आयुक्त कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. देशमुख, अतिरिक्त मनपा आयुक्त डॉ. खेमनार, विकास ढाकणे आदी यावेळी उपस्थित होते.

पुणे विमानतळ येथे या पाहणीला प्रारंभ झाला. विमानतळ येथून ‘जी -२०’ परिषदेचे प्रतिनिधी जे. डब्ल्यू मेरियट हॉटेल या बैठक स्थळाकडे जाणाऱ्या मार्गाची संपूर्ण पाहणी यावेळी पालकमंत्री पाटील यांनी केली. पुणे विमानतळ येथे करण्यात आलेल्या सुशोभीकरणाची माहिती विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी दिली.

विमानतळापासूनच्या प्रतिनिधींच्या प्रवासमार्गावरील विमानतळ, येरवडा कारागृहाची सीमाभिंत, पुणे रेल्वे स्थानक तसेच अन्य शासकीय संस्था, खासगी इमारतींच्या सीमाभिंतीवर करण्यात आलेली कलात्मक रंगरंगोटी, रंगवण्यात आलेली चित्रे, पुणेरी पाट्या, पुण्याची वैशिष्ट्ये असलेल्या संकल्पनाधिष्ठीत रंगकामाची व सुशोभिकरणाची पाहणी पालकमंत्री पाटील यांनी यावेळी केली. झालेल्या कामांची माहिती घेऊन आवश्यक त्या सुधारणांचेही निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विकास हा मुळावर उठणारा नव्हे तर शाश्वत असावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Aprna

तलावात कार बुडाली, बाप-लेकाचा मृत्यू

News Desk

…आता मराठा बांधवांनीही मुस्लिमांच्या आरक्षणासाठी पाठिंबा द्यावा !

News Desk