HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

आमची भाजपशी मैत्री, याचा अर्थ आम्ही सरकार बनवू असा नाही!

मुंबई | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (४ जुलै) शिवसेनेसोबत कोणतंही शत्रुत्व नाही, युतीबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेऊ, असं विधान केलं होतं. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्रजींनी जे सांगितलं ते बरोबरच आहे. मतभेद आहेत. आमचे रस्ते वेगळे आहेत. पण मैत्री कायम आहे. पण याचा अर्थ आम्ही सरकार बनवू असा नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. आजपासून सुरू झालेल्या २ दिवसीय पावसाळी अधिवेशनात भाजप नेते संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर पुन्हा काही बोलणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

संजय राऊत यांनी आज (५ जुलै) पत्रकारांशी साधताना हे विधान केलं. काल देवेंद्रजींनी जे सांगितलं ते बरोबरच आहे. आमच्यात मतभेद आहेत. आम्ही इतकी वर्षे तेच सांगत होतो. आमचे आता मार्ग वेगळे झाले आहेत. रस्ते वेगळे आहेत. पण मैत्री कायम आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही सरकार बनवू, असं सांगतानाच परिस्थितीनुसार युती होऊ शकते, याबाबत मला काही माहीत नाही. त्यांच्याकडे अधिक माहिती असू शकते, असा टोला राऊत यांनी फडणवीसांना लगावला आहे.

ठाकरे सरकार उत्तम चाललं आहे

ठाकरे सरकार उत्तम चाललं आहे. आम्ही पाच वर्ष पूर्ण करणारच आहोत. त्यामुळे इतरांनी काळजी करण्याचं कारण नाही, असं सांगतानाच तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

हंगामा केला तर कसं होईल?

राज्याचं अधिवेशन आज सुरू होत आहे. त्यामुळे विरोधकांनी हंगामा करू नये. दोन दिवसात महाराष्ट्राच्या प्रश्नांची चर्चा अधिवेशनात केली पाहिजे. तुम्ही हंगामा कराल तर प्रश्नांवर चर्चा कशी होईल?, असा सवालही त्यांनी केला.

उद्धवजी नक्कीच बोलतील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच अधिवेशनाच्या पूर्व संध्येला पत्रकारांशी संवाद साधला नाही. त्यावर उद्धवजी नक्की पत्रकारांशी नक्की बोलतील असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेलं विधान बरोबरच आहे. आपण सर्व भारतवासी आहोत, असं त्यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी युतीवर सूचक विधान केलं होतं. “आमच्यात शत्रुत्व कधीच नव्हतं. आमच्या वैचारिक मतभेद निर्माण झाले. कारण आमचा हात सोडून आमचे मित्र ज्यांच्याविरोधात निवडून आले त्यांचा हात पकडून निघून गेले. त्यामुळे मतभेद उभे झाले. हा धुऱ्याचा वाद नाही. आमच्यात कुठलेही शत्रूत्व नाही. युतीबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेऊ,” असे फडणवीस म्हणाले होते.

Related posts

उर्मिला मातोंडकर यांच्यावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप

News Desk

भंडारा घटनेतील मृत बालकांच्या पालकांना ५ लाखांची मदत जाहीर – राजेश टोपे

News Desk

‘झाडे वाचवा, जंगले वाचवा’ असे सांगणाऱ्यांना गुन्हेगार ठरवले जातात – संजय राऊत

News Desk