Site icon HW News Marathi

गुंतवणुकीस प्रोत्साहन देऊन राज्यातील बंदरे विकासाला गती देणार! –  दादाजी भुसे

मुंबई । राज्याच्या विकासात व आर्थिक प्रगतीत बंदरे क्षेत्राचा वाटा महत्त्वाचा असून या क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यास प्रोत्साहन देवून राज्यातील बंदरे विकासाला गती देण्यात येत असल्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी सांगितले.

बंदरे विकास धोरण संदर्भात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड सभागृह येथे लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी भुसे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार आदिती तटकरे, आमदार नितेश राणे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार वैभव नाईक, आमदार शांताराम मोरे, आमदार प्रकाश सुर्वे तसेच बंदरे विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, बंदरे विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात, मुख्य बंदर अधिकारी कॅ. संजय शर्मा आदी उपस्थित होते.

मंत्री भुसे यांनी मच्छिमार संघटना, प्रवासी जल वाहतूक संघटना तसेच खासगी पोर्ट संचालक यांच्याशी संवाद साधला व नव्याने तयार करण्यात येत असलेल्या धोरणासंदर्भात मांडण्यात आलेल्या सूचना जाणून घेतल्या.

बंदरे व खनिकर्म मंत्री भुसे म्हणाले, बंदरांच्या विकासामुळे आर्थिक विकासाला चालना मिळते. जागतिक स्तरावरही बंदरे विकास क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. बंदरे विकास क्षेत्रात महाराष्ट्रात मोठ्या संधी आणि क्षमता आहेत. या क्षेत्रातील उद्योग समूहांनी गुंतवणूकीसाठी पुढे यावे, असे आवाहन भुसे यांनी केले.

पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, कोकणातील सर्वच जिल्ह्यांत खाड्यांमध्ये प्रवासी जल वाहतूक सुरू करून पर्यटन व्यवसायाला चालना देण्यात यावी. शिपयार्ड बांधणी व त्याच्या विकासाला गती देण्यात यावी. रायगड जिल्ह्यात केरळच्या धर्तीवर बॅक वॉटर वाहतूक विकसित करता येणे शक्य आहे त्यादृष्टीने आराखडा तयार करण्यात यावा. विजयदुर्ग बंदराचा विकास करण्यात यावा, असेही केसरकर यांनी सांगितले.

मच्छिमार बांधवांना सर्व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देणार

मच्छिमार संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत संवाद साधताना बंदरे व खनिकर्म मंत्री भुसे म्हणाले,बंदरे विकास क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. या सर्व आव्हानांवर मात करत मच्छिमार बांधवांना सर्व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. मच्छिमार बांधवांशी संबंधित सर्व विभाग व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. मच्छिमार संघटनाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून लवकरच दिलासादायक निर्णय घेतले जातील, असेही भुसे यांनी सांगितले.

प्रवासी जल वाहतूकदारांनी आपल्या व्यवसायात जलद गतीने अद्ययावतीकरण करावे

प्रवासी जलवाहतूक संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत संवाद साधताना बंदरे व खनिकर्म मंत्री भुसे म्हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. येथे प्रवासी जल वाहतूक क्षेत्रात अधिक चांगल्या सुविधा देण्यात याव्यात यावर भर देण्यात याव्यात.या क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. प्रवासी जल वाहतूकदारांनी आपल्या व्यवसायात जलद गतीने अद्ययावतीकरण करावे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा द्यावी. पर्यटनाला चालना देण्यासाठी मदत करावी. यातून रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल. यातून मुंबईतील वाहतूक समस्याही सुटण्यासाठी मदत होईल.वाहतूकदारांना सर्व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. प्रवासी जलवाहतूक संघटनांच्या विविध महत्त्वपूर्ण मागण्यांचा गांभिर्याने विचार करुन अंमलबजावणी केली जाईल, असेही भुसे यांनी सांगितले.

बंदरे विकास क्षेत्रात गुंतवणूकीसाठी पुढे यावे

खासगी पोर्ट संचालक प्रतिनिधींसमवेत संवाद साधताना बंदरे व खनिकर्म मंत्री भुसे म्हणाले, बंदरे विकास क्षेत्रात महाराष्ट्रात मोठ्या संधी आणि क्षमता आहेत. बंदरांच्या विकासामुळे आर्थिक विकासाला चालना मिळते. जागतिक स्तरावर या क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. या क्षेत्रातील उद्योग समूहांनी यासंदर्भातील कुशल मनुष्यबळ निर्माण करावे, जहाजबांधणी प्रकल्पांसाठीही उद्योजकांनी पुढे यावे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठीही प्रयत्न करण्यात यावेत. या दरम्यान खासगी पोर्ट संचालक प्रतिनिधींनी मांडलेल्या सूचना महत्त्वपूर्ण असून बंदरे विकासासाठी नक्कीच त्यांचा सकारात्मक विचार करुन निर्णय घेतले जाईल, असे भुसे त्यांनी सांगितले.

Exit mobile version