HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई राजकारण

मोदी सरकारवर केलेले आरोप पुराव्यानिशी सिद्ध करा…चंद्रकांत पाटलाचं नवाब मलिकाना चॅलेंज !

पुणे | महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती बिकट झालेली असताना सत्ताधारी आणि विरोक मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात मग्न आहेत. सामान्य जनतेची प्रचंड परवड होताना सध्या पाहायला मिळत आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये नवाब मलिक यांनी केंद्र सरकरवर अत्यंत गंभीर आरोप केले त्यानंतर महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांनी मलिकांवर हल्लाबोल केला.आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यासंबंधी बोलत असताना  शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने आता तरी सामान्य माणसाच्या मदतीला धावावे आणि सातत्याने केंद्र सरकारवर बालीश आरोप करणे बंद करावे, असा सल्ला दिला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, आपले अपयश लपविण्यासाठी सतत केंद्र सरकारवर आरोप करायचे आणि वाद निर्माण करून कोरोनाच्या संकटापासून जनतेचे लक्ष विचलित करायचे, असे राजकारण महाविकास आघाडीकडून चालू आहे. सामान्य जनता चहुबाजूंनी संकटात असताना महाविकास आघाडीकडून आरोपांचे राजकारण चालू आहे. परंतु, राज्य सरकारने आता तरी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी शक्ती एकवटली नाही तर सामान्य लोकांच्या संतापाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की,  राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी रेमडिसिवर औषधाबाबत काल केलेला आरोप बालीश आणि हास्यास्पद आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडिसिवर विकण्यास सोळा कंपन्यांना मनाई केली, असा धादांत असत्य आरोप त्यांनी केला. त्यासाठीचे पुरावे मागितले तर त्यांनी ते दिलेले नाहीत. केंद्रावर आरोप केला असताना त्यांनी गुजरात सरकारचा आदेश दाखविला. एखाद्या कंपनीने रेमडिसिवर विकण्यासाठी गुजरात सरकारला परवानगी मागितली तर ते सरकार केवळ त्यांच्या राज्यापुरताच आदेश देऊ शकते.

महाराष्ट्र सरकारनेही असाच आदेश दिला आहे. असे असताना नवाब मलिक यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आरोपाची केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी दखल घेतली आणि माहिती देण्याची विनंती केली. नवाब मलिक यांनी माहिती दिलेली नाही. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी वारंवार ‘आरोप करा आणि पळून जा’, असा प्रकार चालू आहे. पण आता आम्ही हे प्रकरण धसास लावल्याशिवाय राहणार नाही. नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवरील आरोप पुराव्यानिशी सिद्ध करावा किंवा माफी मागावी.

Related posts

भारतमाता चित्रपटगृहासमोर मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन

महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटले

News Desk

#Aurngabad : मृत मजूरांना देशभरातील नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

News Desk