Site icon HW News Marathi

विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून निधीचा योग्य विनियोग करावा! – उदय सामंत

मुंबई । रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांतील विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून निधीचा योग्य विनियोग करण्याच्या सूचना रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी काल (२८ सप्टेंबर ) येथे दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासंदर्भातील विकासकामांची आढावा बैठक मंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्या वेळी त्यांनी यंत्रणाप्रमुखांना निर्देशित केले. बैठकीस रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, आयुक्त गणेश देशमुख, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग व सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत यांनी विविध योजनांच्या अंमलबजावणीची जिल्ह्यातील सद्यस्थिती जाणून घेऊन  कामांच्या निकडीनुसार प्राधान्य क्रम ठरवावा आणि त्याप्रमाणे विहित कालावधीत योजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. रायगड जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राची व्याप्ती लक्षात घेऊन कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत औद्योगिक क्षेत्रास पूरक असलेले प्रशिक्षण कार्यक्रम राबवावे. जेणेकरून प्रशिक्षणार्थींना रोजगार संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. तसेच जिल्ह्यातील अवैध मासेमारी, परराज्यातील मासेमारी बंद करण्याच्या दृष्टीने मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक कारवाई करावी. आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्राधान्याने लक्ष द्यावे. महिला विषयक योजनेची सर्व कार्यालये एका ठिकाणी आणण्यासाठी महिला भवन उभारणीचे काम पूर्ण करताना त्या ठिकाणी महिला बचत गटाच्या उत्पादन विक्री केंद्राची सुविधा आवर्जून उपलब्ध करून द्यावी. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कर्ज वितरण करण्यासाठी बॅंकांना सक्त सूचना देण्याचे त्यांनी निर्देशित केले.

लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना

लम्पी रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सतर्कतेने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तातडीने लसीकरणाची विशेष मोहीम राबवून सर्व जनावरांचे लसीकरण करून घ्यावे जेणेकरून या आजाराचा प्रादुर्भाव रोखता येईल.

रत्नागिरी

ग्रामीण भागातील मुलींचे शाळेत येण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी उपक्रम, कार्यक्रम राबविण्यात यावे. तसेच  यासाठी  विशेष प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करावे.

जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या सुदृढतेसाठी प्राधान्याने कृती कार्यक्रम राबवून सर्व कुपोषित बालकांची, त्यांच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कोवीडमध्ये पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विशेष काळजी घ्यावी.

जिल्हा परिषदेच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा निधी नियमानुसार विहीत कालावधीत वापरला जाईल, यासाठी खबरदारी घ्यावी. शिक्षण सुविधा बळकट करण्यासाठी जिल्हा परिषदने विशेष लक्ष द्यावे.  शुभमंगल सामुहिक विवाह योजनेची अधिक प्रभावी अंमलबजावणी करावी. मेरीटाइम बोर्डाने मासे विक्रेत्यांसाठी सुविधायुक्त मासे विक्री केंद्राची सुविधा उपलब्ध करून द्यावी. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे विकसित करण्याचे काम  अधिक गतीने करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

अंगणवाडी, महिला बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा ,पाटबंधारे विभाग, आरोग्य, शिक्षण, नगरविकास, यासह जिल्ह्यातील विविध योजनांची अंमलबजावणी विहीत कालावधीत करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी यंत्रणांना दिल्या.

पर्यटनवृद्धीवर भर द्यावा

पर्यटन  हा रत्नागिरी जिल्ह्याचा  पाया आहे. त्या दृष्टीने पर्यटन व्यवसायाच्या संधी आणि पर्यटनवृद्धीवर  भर द्यावा. त्या पार्श्वभूमीवर आंबा महोत्सवाचे अधिक व्यापक नियोजन करावे. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे विश्रामगृह सुविधायुक्त आणि सुसज्ज ठेवण्याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री सामंत यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

Exit mobile version