HW News Marathi
महाराष्ट्र

“पंकजा मुंडे या फडणवीसांवर नाराज”, रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

पुणे | केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळं पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी पक्षातील पदांचे राजीनामे देऊ केले होते. पंकजा यांनी समर्थकांची समजूत काढली असली तरी त्यांची स्वत:ची नाराजी लपून राहिलेली नाही. समर्थकांसमोर केलेल्या भाषणातून ही नाराजी उघड झाली. भाजपच्या नेत्यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली असली तरी भाजपच्या मित्रपक्षाचे नेते अर्थात रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी आज (१६ जुलै) या मुद्द्यावर खुलेआम भाष्य करत नव्या चर्चेला वाचा फोडली आहे.

पुण्यात असलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना पत्रकारांनी पंकजा मुंडे यांच्या नाराजीबद्दल विचारणा केली. त्यावर, पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहेत, असं आठवले यांनी सांगून टाकलं. ‘पंकजा या गोपीनाथ मुंडेंच्या तालमीत तयार झाल्या आहेत. त्या भाजपमध्येच राहतील. त्यांनी पदापेक्षा पक्षासाठी काम करावं,’ असंही आठवलेंनी पुढं सांगितलं आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस किंवा पंकजा मुंडे काय प्रतिक्रिया देतात का पाहणे महत्वाचे असणार आहे.

भाजपमध्ये बहुजनांचं नेतृत्व संपवलं जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्यानं होत आला आहे. हा आरोप करताना एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे व पंकजा मुंडे यांची नावं घेतली जातात. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा यांना पक्षांना विधान परिषदेवर आमदारकीची संधी नाकारली गेली. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे स्थान दिलं जाईल, अशी अपेक्षा होती. तीही फोल ठरली. त्यामुळं या आरोपांना जोर चढला आहे.

‘पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही’,फडणवीसांचं पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ भाषणावर उत्तर

केंद्रिय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना जागा न मिळाल्याने मुंडे समर्थकांत कमालीची नाराजी होती. या नाराजीनंतर कार्यकर्ते पंकजा मुंडेंच्या भेटीला मुंबईत आले होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. यावेळी मोदी-शाहांचं नाव घेऊन राज्यातील नेत्यांना डावलल्याची खास करुन देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याची चर्चा होती. आता पंकजा मुंडे यांच्या याच भाषणावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजांच्या भाषणावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी भाषण केलं, तुम्ही ते भाषण ऐकलं का? असा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना, ‘पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही’, असं म्हणत फडणवीसांनीही पंकजांना त्यांच्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे. “पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही. आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पंकजा ताईंच्या भाषणावर खुलासा केला आहे. त्यांच्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर खुलासे केले आहेत. त्यावर मी बोलण्यात अर्थ नाही”, असं म्हणत ‘पंकजा’ या विषयावर फडणवीसांनी अधिक बोलणं टाळलं.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?

नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा झाली. परंतु अखेरीस त्यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. त्यात भरीस भर म्हणजे पंकजा मुंडे समर्थकांनी राजीनाम्याचं सत्र सुरु केलं. यानंतर पंकजा मुंडे यांनी दिल्ली वारी देखील केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची पंकजांनी भेट घेतली. त्यानंतर वरळीत पत्रकार परिषद घेत “माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. आम्ही कुणाला घाबरत नाही. मी कुणाचा निराधार करत नाही,” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधल्याची चर्चा होती.

“आपली शक्ती कमी करण्याचा डाव आहे, पण आपण हा डाव पूर्ण होऊ द्यायाचा नाही. मला पुढेही खडतर मार्ग दिसतो आहे. योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. आपण वारकरी आहोत, सात्विक आहोत. ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू” माझा निवडणुकीत पराभव झाला. आज माझ्याकडे पदाचा अलंकार नाही. स्वाभिमानी राजकारण केले आहे. पंतप्रधानांनी मला झापल्याचं वृत्त काही माध्यमांनी चालवलं. मात्र माझ्या चेहऱ्यावर तसं काही दिसतं का? मला पंतप्रधानांनी कधी अपमानित केले नाही. नाही राष्ट्रीय अध्यक्षांनी अपमानित केले, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेडमध्ये वीज पडून शेतकरी जखमी, एक म्हैस व गायीचे वासरु ठार

News Desk

रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांचा सहयाद्री अतिथीगृह येथे सत्कार

News Desk

धनंजय मुंडेंच्या भेटीसाठी पंकजा-प्रीतम मुंडे ब्रीच कँडी रुग्णालयात

Aprna