Site icon HW News Marathi

तुळजाभवानी मंदिर परिसरात भीक मागणाऱ्या बालकांची सुटका

प्रतिनिधी : उदय साबळे पाटील

उस्मानाबाद | तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर परिसर व शहरात भीक मागणाऱ्या 18 बालकांना शुक्रवारी दुपारी 23 सप्टेंबर रोजी पथकाने ताब्यात घेतले आहे. या बालकांमध्ये 3 मुली व 15 मुले ताब्यात घेण्यात आली आहेत. ताब्यात घेतलेल्या बालकांना बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात बाल संरक्षण समितीने धडक कारवाई केली न्यायालयाच्या आदेशानंतर मुलांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

या मुलांच्या आई-वडिलांची ओळख पटेपर्यंत मुलांना बाल सुधार गृहात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. बाल संरक्षण समितीने नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली आहे. श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात भीक मागणाऱ्या बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी बाल संरक्षण समितीने शुक्रवारी हे रेस्क्यू ऑपरेशन केले आहे. यावेळी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये ताब्यात घेतलेल्या या बालकांचे समुपदेशन करण्यात आले.

शुक्रवारी दुपारी श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात हे ऑपरेशन राबवण्यात आले. श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात एकूण 18 अल्पवयीन मुले भीक मागताना प्रशासनाच्या पथकाला आढळून आली. त्यात 15 मुलं आणि 3 मुलींना ताब्यात घेतले. सदरील मुलांना सांजा रोडच्या बालसुधारगृहात तर मुलींना नळदुर्गच्या आपलं घर मध्ये ठेवण्यात आले आहे. तालुका शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन, नगरपरिषद प्रशासन, तहसील प्रशासन, बाल संरक्षण समिती, चाइल्ड लाईन आदी विभागाच्या साठ अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईच्या पथकात सहभाग घेतला होता.

Exit mobile version