Site icon HW News Marathi

गणेशोत्सवापूर्वी कोकणातून जाणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करा! – रवींद्र चव्हाण

मुंबई | गणेशोत्सव (Ganesh Utsav) साजरा करण्यासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा रस्तेमार्ग प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी कोकणातील रस्त्यांच्या दुरस्तीची कामे 25 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण करण्यात यावीत. सध्या या महामार्गावर खड्डे भरण आणि दुरस्तीची कामे कंत्राटदारांकडून सुरू आहेत. ही कामे अधिक जलद गतीने होण्यासाठी आवश्यकतेनुसार जास्तीत जास्त कंत्राटदारांकडून करून घ्या आणि पूर्ण ताकदीने आणि युद्धपातळीवर काम करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आजच्या (22 ऑगस्ट) बैठकीत दिल्या.

 

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीत शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर, खासदार सर्वश्री सुनील तटकरे, विनायक राऊत, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, भरत गोगवले, नितेश राणे, वैभव नाईक, राजन तेली, योगेश कदम, रविशेट पाटील, शेखर निकम, किरण पावसकर, राजन साळवी, अनिकेत तटकरे, आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) एस. एस. साळुंखे, सचिव (बांधकाम) पी. डी. नवघरे, मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) संतोष शेलार, कोकण विभागाचे मुख्य अभियंता एस. एन. राजभोग, रायगडच्या वरिष्ठ अभियंता श्रीमती सुषमा गायकवाड, रत्नागिरीच्या वरिष्ठ अभियंता नाईक, रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता (राष्ट्रीय महामार्ग)  जाधव आदी उपस्थित होते.

 

मुंबई गोवा महामार्गाच्या दुरुस्तीसंदर्भात उपस्थित सर्व आमदार आणि खासदार यांनी आपापल्या मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत सूचना केल्या असून या सूचनांचा सकारात्मक विचार करून त्यावर तात्काळ आणि जलदगतीने निर्णय घेऊन काम करण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या. याचबरोबर संपूर्ण महामार्गावर वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी जास्तीत जास्त  ट्रॅफिक वॉर्डन तैनात करून वाहतूक व्यवस्थापन सुरळीत ठेवण्याचे आदेशही वाहतूक विभागाला देण्यात आले. रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे ज्या ज्या कंत्राटदारांकडे देण्यात आली आहे, त्यांच्या कामावर नजर ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील एक अभियंता नेमून देऊन या दोघांचीही नावे शासनाच्या संकेतस्थळावर टाकण्याचे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले.

Exit mobile version