HW News Marathi
देश / विदेश

मराठा आरक्षणावर दानवेंचा क्लास लावू, राऊतांचा दानवेंवर घणाघात

नवी दिल्ली | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारसह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंवर जोरदार टीका केली आहे. आम्हाला अभ्यास शिकवू नका. आधी मराठ्यांना आरक्षण द्या. मग आम्हाला शिकवा, असा हल्ला चढवतानाच मराठा आरक्षणावर आम्ही रावसाहेब दानवेंचं कोचिंग करू, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

संजय राऊतांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची आज (२१ जुलै) बैठक पार पडली. यावेळी राऊतांनी मराठा आरक्षणावरून केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. महाराष्ट्रातील काही प्रश्न आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत आले होते. त्यांनी पंतप्रधानांना ११ मागण्यांचं निवेदन दिलं आहे. यातील अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भातील आहेत.

काही सामाजिक प्रश्न आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाशी संबंधित आहेत. रेल्वे मेट्रो, जीएसटी परतावा, पीक विमा प्रश्न आहे. या सर्व विषयांना चालना देण्यासाठी खासदारांनी एकत्र प्रयत्न करावेत. त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून पाठपुरावा करण्यासाठी ही बैठक झाली. आता या ११ मागण्यांवर आम्ही पुढील आठवड्यापासून पाठपुरावा करणार आहोत, असं राऊत म्हणाले आहेत.

रावसाहेब दानवेंची शिकवणी लावू

शिवसेना नेत्यांचा आरक्षणावरील अभ्यास कच्चा आहे, असं रावसाहेब दानवे यांनी वक्तव्य केलं होतं. त्याचाही राऊत यांनी अत्यंत तिखट शब्दात समाचार घेतला. आम्ही त्यांची शिकवणी लावू. त्यांची शिकवणी लावून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर तेही करू. इथे माझ्यापासून दोन पावलांवरच आमचे रावसाहेब राहतात. काही हरकत नाही. त्यांचा क्लास लावून टाकू. कोचिंग करू त्यांचे. पण आरक्षण द्या. इथं विषय अभ्यासाचा नाही. भले भले अभ्यास करणारे लोकं मराठा समाजात आहेत. त्यांनी आरक्षणातील कायदेशीर किस काढला आहे, असं ते म्हणाले आहेत.

आम्हालाही शिकवता येतंच

आज सकाळी अशोक चव्हाण माझ्याकडे आले होते. ते माजी मुख्यमंत्री आहेत. मराठा आरक्षण उपसमितीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी माझ्याकडे काही कायदेशीरबाबी मांडल्या. त्यावर आम्ही चर्चा केली. त्यामुळे ही शिकवणी वगैरे, अभ्यास वगैरे आम्हाला सांगू नका. आम्हाला माहीत आहे. हिंमत असेल तर बोलू नका. तुमच्या दरबारात आम्ही आलो होतो प्रधानमंत्र्यांना भेटायला. मुख्यमंत्री स्वत: आले होते.

अजित पवार, अशोक चव्हाण सोबत होते. द्या ना आरक्षण. अभ्यास कुणाला शिकवताय. तुम्ही द्या, मग आम्हाला शिकवा. नाही तर आम्हाला पण शिकवता येतं, असा हल्ला त्यांनी दानवेंवर चढवला. खासदार विनायक राऊत यांनी मराठा आरक्षणावर स्थगन प्रस्ताव दिला आहे. तो स्विकारला जावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. केंद्र सरकारने हा प्रस्ताव स्विकारावा. मग आमचा अभ्यास किती दांडगा आहे ते पाहावं, असं आव्हानच त्यांनी दानवेंना दिलं.

मराठा आरक्षणाापासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या 11 प्रश्नावर आम्हाला पंतप्रधानांना भेटायचं आहे. पंतप्रधानांची आम्ही वेळ मागत आहोत. वेळ मिळताच पंतप्रधानांना भेटून आमच्या मागण्या सादर करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे राऊतही पंतप्रधानांना भेटल्यावर मराठा आरक्षणावर काही तोडगा निघणार का? आणि रावसाहेब दानवे आपल्या स्टाईलमध्ये राऊतांना उत्तर देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रमजानमध्ये दहशतवाद्यांविरोधी कारवाया थांबवा, मुफ्तींची मागणी

News Desk

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा १ जवान शहीद, १ जखमी

News Desk

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा परिसरात एका दहशतवाद्याचा खात्मा

swarit