HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा २०१९

…तर विधानसभेत आपणही मेरिटमध्ये येऊ शकतो !

पुणे | “सलग ४५ दिवस अभ्यास केल्यानंतर माझा मुलगा मेरिटमध्ये येतो. तर आपल्याकडेही तितकेच दिवस आहेत. ‘नाना देवकाते’ आपणही मेरिटमध्ये येऊ शकतो. आपण जेवढे आहोत तेवढे मिळून एकजुटीने विधानसभेत मेरिटमध्ये येऊ शकतो”, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या गळतीमुळे राज्यात आपले अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान सध्या पक्षापुढे आहे. पक्षातील याच परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना एक विश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे.

सुप्रिया सुळे यांनी यावेळी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर देखील निशाणा साधला आहे. “कोणी कितीही कोलांटउड्या मारल्या तरीही आपण जेवढे राहिलो तेवढे मिळून आगामी विधानसभा निवडणुकीत एकजुटीने मेरिटमध्ये येऊ शकतो”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. “माझ्या मुलाला गणित विषयात फक्त ४० ते ५० गुण मिळत होते. बोर्डाच्या परीक्षेला ४५ दिवस राहिले असताना त्याच्याच शाळेतील शिक्षिकेच्या शिकवणीमुळे तो मेरिटमध्ये आला. नाना देवकाते आता आपल्याकडेही 45 दिवस आहेत. त्यामुळे आपणही मेरिटमध्ये येऊ शकतो”, असे सुळे म्हणाल्या.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केले आहेत. अद्याप हे पक्षांतर सुरूच आहे. यात विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे धक्के बसत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात आता राष्ट्रवादीला आपले अस्तित्व टिकविण्याची धडपड करावी लागत आहे.

Related posts

बेस्टच्या कंडक्टरला कोरोनाची लागण, परळ बेस्ट वसाहत पोलीसांनी केली सील

News Desk

भागवत आणि मोदींकडे एके ४७ कुठून आल्या ?

News Desk

विजय वडेट्टीवार यांनीही दिला लॉकडाऊनचा इशारा

News Desk