Site icon HW News Marathi

जी २० परिषदेनिमित्त राज्याला जगासमोर प्रदर्शित करण्याची सुवर्णसंधी! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली । जी २० परिषदेच्या (G20 Council) निमित्ताने राज्याला जगासमोर प्रदर्शित करण्याची संधी मिळणार असल्याची प्रतिक्रिया बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

येथील राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक सभागृहात सोमवारी (५ डिसेंबर) जी 20 परिषदेसंदर्भात सूचना, चर्चा आणि धोरण ठरविण्याबाबत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली.  या बैठकीस मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, वित्तमंत्री निर्मला सीतारामन, पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव उपस्थित होते. यासह विविध पक्ष प्रमुख या बैठकीस उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर (औरंगाबाद) या चार ठिकाणी जी 20 च्या 14 बैठका होणार आहेत. यानिमित्त राज्याचे ब्रॅण्डींग, राज्यातील विकासाचे प्रकल्प, आपली संस्कृती, जगासमोर मांडण्याची संधी लाभली आहे. या दृष्टीने राज्यात गतीने कामे सुरू असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

राज्यात आतापर्यंत जी-20 च्या संदर्भात झालेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला असून, मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यात यासंदर्भात  सुरू असलेल्या  कामांबाबत माहिती दिली. जी 20 बैठकीचे स्वरूप कसे असेल याबाबत याप्रसंगी सादरीकरण झाले.

Exit mobile version