HW News Marathi
महाराष्ट्र

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट मदत! – आरोग्यमंत्री  

उस्मानाबाद । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनातर्फे एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी काल (१५ ऑगस्ट) येथे दिली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आलेले मुख्य शासकीय ध्वजारोहण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जनतेला शुभेच्छा देताना प्रा.डॉ.सावंत यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले-डंबे, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विकास जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार सर्वश्री राणा जगजितसिंह राणा पाटील, कैलास पाटील आदींसह स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, अधिकारी-कर्मचारी, महिला-विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहण केल्यानंतर प्रा.डॉ.सावंत आणि इतर मान्यवरांनी स्वातंत्र्य सैनिक स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

देशात 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्याची रम्य प्रभात झाली. असंख्य बलिदानांचे सार्थक झाले आणि भारताला पारतंत्र्यातून मुक्तता मिळून स्वातंत्र्य मिळाले. बघता बघता स्वातंत्र्याचा प्रवास 75 वर्षांचा झाला आहे. म्हणूनच आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत. राष्ट्रातील नागरिकांच्या जीवनात स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करणे ही बाब अनन्यसाधारण स्वरुपात महत्वाची आहे. राज्यातील नागरिकांच्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी आता आपणास भविष्यात कशी पावले उचलावी लागतील ? याचा विचार आजच्या दिनी करावा लागेल. कारण आता आपण सिंहावलोकन करण्याच्या टप्प्यावर आहोत, असे सांगून प्रा.डॉ.सावंत म्हणाले आपल्या देशास आणि महाराष्ट्रास नैसर्गिक साधन संपत्तीचा समृध्द वारसा लाभला आहे. महाराष्ट्राचा सह्याद्री देशाची शान आहे. माथी हिमालय उभा आहे. पायी सागराच्या लाटा लोळण घालत आहेत. देशातून गंगा, गोदावरी, ब्रम्हपुत्रा सारख्या नद्या आपल्या रक्त वाहिन्या आहेत. सैनिक आणि जवान डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमांचं रक्षण करीत आहेत. शेतकरी आता लोकराजा बनला आहे. देशातील जनतेचं भरण पोषण करण्यात तो आता सक्षम झाला आहे. आपल्या देशास आणि महाराष्ट्रास ऐतिहासिक आणि सांस्कृतिक समृध्द वारसा लाभला आहे. त्याचेही जतन करण्याची जबाबदारी आपणावर आहे, असेही ते म्हणाले.

आपल्या राष्ट्रध्वजाचा अधिक सन्मान वाढविण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत “घरोघरी तिरंगा” मोहिम जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरांवर राष्ट्रध्वज डौलाने फडकताना दिसतो आहे. या मोहिमेमुळे नागरिकांच्या मनात देशभक्ती जागृत करणे आणि आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढविण्याचा हेतू साध्य झाल्याबद्दल समाधान व्यक्त करुन प्रा.डॉ.सावंत यांनी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाने आणि राज्याने विविध क्षेत्रात अमुलाग्र प्रगती साधली आहे. यात सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रगतीबरोबरच उद्योग आणि सांस्कृतिक क्षेत्रातही महाराष्ट्र देशात कायम आघाडीवर राहिला आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसह समाजातील मागासवर्गीय आणि वंचित घटकांतील नागरिकांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या आर्थिक आणि सर्वांगीन प्रगतीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्य शासन समाजातील सर्वच घटकांच्या सर्वांगीन प्रगतीसाठी कल्याणकारी योजना राबवून कल्याणकारी राज्याचा हेतू साध्य करीत आहे, अशी भावना व्यक्त केली.

राज्यात गेल्या महिना भरापासून कोसळणाऱ्या सततच्या अतिवृष्टीमुळे आणि महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना मदत करण्याचा राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या (एनडीआरएफ) निकषाच्या दुप्पट मदत देण्यात येणार आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना (जिरायती) हेक्टरी 6800 रुपये प्रमाणे मदत एनडीआरएफच्या निकषानुसार दिली जाते. ही मदत आतापर्यंत दोन हेक्टरपर्यंत दिली जात होती आता ती तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे, असे सांगून प्रा.सावंत यांनी आमच्या सरकारने ही मदत आता दुप्पट केली आहे. यापुढे ही मदत हेक्टरी 13 हजार 600 रुपये इतकी दिली जाणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 40 हजार 800 रुपये इतकी मदत मिळू शकेल. बागायती शेतीसाठी वाढीव मदत देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने चर्चा केली आहे. आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. यात राज्यातील 14 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. यासाठी सहा हजार कोटी रुपये निधी लागणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वाढत्या महागाईला आळा घालण्याच्या हेतूने राज्य शासनाने पेट्रोल दरात पाच तर डिझेलल्या दरात तीन रुपयांची कपात करुन सामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी 2.0 हे राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्याचा हिस्सा म्हणून सहा हजार 531 कोटी 46 लाख रुपयांचा निधी देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अमृत 2.0 अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी 27 हजार 700 कोटी रुपयांच्या खर्चाचे प्रकल्प राज्यात घेण्यात येणार आहेत. नगर परिषदा व नगर पंचायतींच्या अध्यक्षाची आणि सरपंचाची आता जनतेतून थेट निवड करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना थेट मतदान करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असे सांगून प्रा.सावंत यांनी राज्यातील 15 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी 50 याप्रमाणे एकूण 750 जागा आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी मंजूर करण्यात आल्या आहेत. ही प्रवेश क्षमता वाढल्याने 360 कोटी रुपयांचा राज्याचा हिस्सा देण्यास राज्य सरकारने मान्यता दिल्याचेही स्पष्ट केले.

ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये काही बदल करुन शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे आणि सुलभ मोबाईल ॲप व्हर्जन-2 विकसित करण्यात आले आहे. हे सुधारित मोबाईल ॲप एक ऑगस्ट पासून शेतकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपला पीक पेरा आपण तयार करुन शासनाच्या प्रकल्पास उत्तम प्रतिसाद द्यावा, असे प्रा.सावंत यांनी शेतकऱ्यांना आवाहन करुन जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना साथीचा सामना करण्यासाठी विविध उपाय योजनेच्या माध्यमातून आरोग्य सेवा उंचावण्याचे काम करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण उत्तम आहे. जिल्हा प्रशासनाने ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर्स, बालकांसाठी बेड आदीची सोय केली आहे.नागरिकांनी कोरोनाचा आजार टाळण्यासाठी लसीचे सर्व डोस वेळेवर घ्यावेत. आमच्या सरकारने कोरोनाचा बुस्टर डोस (वर्धक मात्रा) मोफत देण्याच्या मोहिमेची वेगाने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचा संबंधितांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन केले.

यावेळी प्रा.डॉ.सावंत यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. त्यात राज्यात दि.20 नोव्हेंबर 2021 ते 10 जून 2022 या कालावधीत महा आवास अभियान ग्रामीण टप्पा 2.0 राबविण्यात आले होते. या कालावधीत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना जिल्हा स्तरावरील महाआवास अभियान पुरस्कार आणि महाआवास अभियान विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत यामध्ये जिल्हास्तरीय उत्कृष्ट तालुका म्हणून लोहारा-प्रथम,कळंब-द्वितीय आणि तुळजापूर-तृतीय येथील पंचायत समित्यांना तसेच सर्वोत्कृष्ट क्लस्टर म्हणून लोहारा तालुक्यातील जेवळी, कळंब तालुक्यातील येरमाळा, तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा आणि सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीसाठी लोहारा तालुक्यातील आष्टा प्रथम, कळंब तालुक्यातील उपळाई द्वितीय आणि तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा तृतीय यांना तेथील गटविकास अधिकारी, ग्रामीण गृह निर्माण अभियंता तसेच सरपंच किंवा ग्रामसेवक यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

राज्य पुरस्कृत विविध आवास योजना ग्रामीण अंतर्गत जिल्हास्तरीय उत्कृष्ट तालुका प्रथम पुरस्कार कळंब येथील पंचायत समितीला, पंचायत समिती वाशीला द्वितीय तर उस्मानाबाद पंचायत समितीला तृतीय पुरस्कार मिळाला. यावेळी संबंधित पंचायत समित्यांचे प्रशासक तथा गटविकास अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले. सर्वोत्कृष्ट क्लस्टरसाठी कळंब तालुक्यातील मंगरुळ या मंडळास प्रथम, वाशी तालुक्यातील तेरखेडाला द्वितीय आणि उस्मानाबाद तालुक्यातील सांजा या गावास तृतीय पुरस्कार संबंधित ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतसाठी प्रथम पुरस्कार कळंब तालुक्यातील शिराढोण तर द्वितीय पुरस्कार वाशी तालुक्यातील गोजवाडा आणि उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी (आ.) या गावातील संबंधित सरपंच आणि ग्रामसेवकास देऊन गौरविण्यात आले.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस उपनिरीक्षक सुर्यकांत दत्तात्रय आनंदे यांना राष्ट्रपती पोलिस पदक प्रा.डॉ.सावंत यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. आनंदे यांनी तपास, शोध, गुन्ह्यास प्रतिबंध यातील त्यांच्या सिध्द केलेल्या उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रशासनाकडून वेळोवेळी प्रशंसापत्र आणि 271 बक्षिसे मिळाली आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात, सामानातून जोरदार टीका

News Desk

नवनीत राणानी न्यायालयाने घातलेल्या अटीचे उल्लंघन,  सरकारी वकील न्यायालयात जाणार?

Aprna

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ, धमकीचे फोन आल्यामुळे वाढवली सुरक्षा

News Desk